(Mud Skull Off Roading)! बॉलीवूड स्टार सुनील शेट्टीच्या कारचा सुधागडामध्ये थरार

मड स्कल स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन; चाहत्यांची गर्दी
। पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
भारतातील पहिला थ्रिलर आणि डेडली स्पोर्ट्स म्हणून मड स्कल ऑफ रोडिंग (Mud Skull Off Roading) ची ओळख झाली आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्याच्या भूमीवर हा खेळ व शर्यत रंगत आहेत. वेगवेगळे आयोजक स्पर्धा आयोजित करत आहेत. शेकडो खेळाडू (मोटार चालक) यामध्ये सहभागी होत आहेत. हजारो प्रेक्षकांना देखील या खेळाचा थरार व रोमांच अनुभवायला मिळत आहे. आणि रोजगाराच्या संधी देखील निर्माण होताना दिसत आहेत.

नुकतेच सुधागड तालुक्यातील सिद्धेश्‍वर गावाजवळ बॉलीवूड सुपरस्टार सुनील शेट्टीच्या उपस्थितीत मड स्कलच्या दोन दिवसीय तिसर्‍या सीझनला सुरुवात झाली. शर्यतीच्या सुरुवातीपासून अंतिम फेरीपर्यंत सुनील शेट्टीने या शर्यतीत भाग घेतला होता. गोविंद बन्सल यांच्या सिद्धेश्‍वर येथील जागेत ही ऑफ राईड स्पर्धा घेण्यात आली. यावेळी तब्बल दोनशेहून अधिक स्पर्धक आपल्या विशेष गाड्या घेऊन या खेळात सहभागी झाले होते. यावेळी तीन हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते.

काही महिन्यांपूर्वी सुधागड तालुक्यातील वाघोशी येथे व कर्जत तालुक्यात देखील मड स्कलचे (Mud Skull) आयोजन करण्यात आले होते. पुणे, मुंबईसह इतरही राज्यातील स्पर्धक यामध्ये हिरहिरीने सहभागी होत आहेत. केवळ टीव्हीवर पाहिलेला थरार गावखेड्यातील लोकांना प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळत आहे. ही त्यांच्यासाठी देखील पर्वणीच आहे. प्रेक्षकांमध्ये देखील हा खेळ लोकप्रिय होत आहे. शिवाय स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे.

फक्त टीव्हीवर पाहिलेला हा साहसी खेळ जिल्ह्यातील लोक प्रत्यक्ष अनुभवत आहेत. कुटुंबासह त्यांच्या मुलांसह स्पर्धक या गैर-व्यावसायिक ट्रॅकवर गाडी चालवू शकतात. धमाल, संगीत आणि मनोरंजनाचा आनंद घेतात.

फिटनेस आयकॉन, खेळाडू सुनील शेट्टी उर्फ अण्णा हे या खेळाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. मड स्कलचे संस्थापक सॅम खान, सुबोध सिंग आणि आशिष सिंग आहेत. मुडस्कलच्या तिसर्‍या सीझनची सुरुवात सॅम खान, सुबोध सिंग आणि आशिष सिंग यांच्यासह सुनील शेट्टीने खुल्या कारमध्ये केली.

विशेष ट्रॅक व जागा
या खेळासाठी आव्हानात्मक ट्रॅक आणि लोकेशन्स असतात. जिल्ह्यात अशा जागा उपलब्ध देखील आहेत. उंचसखल जागा, चिखल व मातीचा हा ट्रॅक असतो. तेथून विशिष्ट बनावटीच्या मोटार चालविल्या जातात. मड स्कल हा आव्हानात्मक खेळ असला तरी, या खेळात सहभागी होण्याचा आनंद साहसाच्या मर्यादेपलीकडे आहे. कारण सुरक्षिततेसाठी ट्रॅक आणि भूप्रदेश व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला जातो. उत्तम कार, सुरक्षा उपकरणे आणि तंत्रज्ञानाने हा खेळ सुसज्ज आहे.

मड स्कल ऑफ रोडिंग ही आता एक मोठी क्रीडा स्पर्धा आणि उदयोन्मुख न्यू इंडियाचा खेळ आहे. इतर कोणत्याही खेळाप्रमाणे, लोक मड स्कल ऑफ रोडिंगमध्ये उत्साह आणि उत्कटतेने गुंतलेले आहेत.

सुनील शेट्टी, सिनेअभिनेता

Exit mobile version