अलिबाग समुद्रात सुटकेचा थरार

तब्बल 21 तासांनी झाली 14 खलाशांची सुटका

। रायगड । खास प्रतिनिधी ।

अलिबाग समुद्रात गुरुवारी (दि.25) जेएसडब्ल्यु कंपनीचे बार्ज भरकटले होते. हे जहाज धरमतर कडून जयगडच्या दिशेने कोळसा घेऊन निघाले होते. या जहजावरील सर्व खलाशी सुखरूप असून अडकलेल्या खलाशांना तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तटरक्षक दल, रायगड पोलीस यांनी संयुक्तपणे रेस्क्यू ऑपरेशन राबवले. तब्बल 21 तासांनी सर्व खलाशांची सुटका झाली आहे.


खराब हवामान, सोसाट्याचा वारा आणि दृष्यमानता कमी असल्याने हे जहाज भरकटले होते. ते अलिबाग कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस आले. या ठिकाणी ते नांगरून ठेवण्यात आले आहे. या बार्जवर १४ खलाशी होते. सर्व खलाशांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अलिबाग समुद्रकिनारी आणण्यात आले आहे. जहाजावरील सर्व खलाशी हे दहा विविध राज्यातील राज्यातील आहेत. त्यांना अलिबागच्या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सर्वांची नोंद घेण्यात येत असून त्यानंतर सर्व खलाशांना जेडब्ल्यू कंपनी प्रशासनाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ‘कृषिवल’शी बोलताना दिली.

जहाज फुटले.. पाणी भरायला झाली सुरुवात
गुरुवारी दुपारी एक वाजता हे जहाज भरकट असल्याचे जहाजाच्या कॅप्टनच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी जहाजाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, खराब हवामान आणि दृश्यमानता कमी असल्याने हे जहाज भरकटले. त्यानंतर या जहाजावरील ताबा सुटला आणि ते जहाज किल्ल्याच्या मागील बाजूस असणाऱ्या खडकावर आदळले. त्यामुळे जहाजाचा खालील भाग फुटला असून त्यामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.
Exit mobile version