मुंबईत रंगणार कबड्डी स्पर्धांचा थरार

नामवंत संघांचा होणार सहभाग

| मुंबई | प्रतिनिधी |

श्रीमान योगी प्रतिष्ठान मंडळाने ओम साई क्रीडा मंडळ (कांजूर मार्ग) यांच्या सहकार्याने  20 ते 23 एप्रिल या कालावधीत पुरुष व्यावसायिक व स्थानिक महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे.

कांजूर मार्ग (पूर्व) येथील परिवार मैदानावरील मॅटच्या दोन क्रीडांगणावर रंगणार्‍या या कबड्डी स्पर्धेत 12 पुरुष व 12 महिला संघांना सहभाग देण्यात आला आहे. सर्व सामने सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येतील. त्यामुळे कांजूरकरांना प्रो-कबड्डी स्टार खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष पहाण्याची संधी मिळणार आहे. स्थानिक आमदार सुनील राऊत यांचे मोठे सहकार्य लाभलेल्या या स्पर्धेत दोन्ही विभागात मिळून पाऊणे सहा लाख रुपयांच्या रोख रकमेच्या बक्षिसांची खैरात खेळाडूच्या बक्षिसांवर करण्यात येणार आहे. त्याशिवाय स्पर्धेत सर्वोत्तम ठरणार्‍या पुरुष खेळाडूस मोटर बाईक, तर महिला खेळाडूस स्कुटी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील पुरुष व्यावसायिक गटात युवा फलटण, भारत पेट्रोलियम, महिंद्रा, मध्य रेल्वे, बँक ऑफ बडोदा, मुंबई बंदर, सी.जी.एस.टी., मुंबई महानगर पालिका या मुंबईच्या संघाबरोबर, पुण्याचा आयकर, कोल्हापूरचा संजय घोडावत, ठाण्याचा जॉय कुमार तर रायगडचा मिडलाईन संघ लढत देतील. महिला गटात शिवशक्ती, डॉ. शिरोडकर (मुंबई शहर), स्वराज्य, महात्मा गांधी, नवशक्ती (उपनगर), राजमाता जिजाऊ, राजा शिवछत्रपती (पुणे), जिजाऊ प्रतिष्ठान (कोल्हापूर), कर्नाळा स्पोर्ट्स (रायगड), शिवतेज (ठाणे), कुर्लाई (पालघर), होतकरू (ठाणे) हे संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेतील पुरुष गटात विजयी होणार्‍या संघास रोख रु. 1 लाख, तर महिला गटात रोख रु. 51 हजार व चषक देण्यात येईल. उपविजेत्या पुरुषांना रोख रु. 50 हजार, तर महिलांना रोख रु. 35 हजार व चषक प्रदान करण्यात येईल. उपांत्य उपविजयी पुरुष दोन्ही संघांना रोख रु. 25 हजार , तर महिला दोन्ही संघांना रोख रु. 15 हजार व चषक देण्यात येईल. या स्पर्धेत क्षेत्ररक्षण करण्याच्या जागेनिहाय देखील रोख रकमेची बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेत व खेळाडूंच्या व्यवस्थेत कोणतीही कसर राहू नये म्हणून आमदार सुनील राऊत जातीने लक्ष ठेऊन आहेत. माहितीकरिता संपर्क:- गिरीश पवार 9867146345 किंवा अमित ताम्हणेकर 8779210104.

Exit mobile version