| रेवदंडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील मांडला येथील जमिनीच्या व्यवहारातून तब्बल 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील अयुब हमीद खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.
फिर्यादीनुसार, मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मागे घेण्यासाठी तसेच नदीवरील पुलाच्या बांधकामात अडथळा आणू नये म्हणून आरोपीकडून वारंवार पैशांची मागणी करण्यात येत होती. सुरुवातीला 2 लाख 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दोन वेळा 25-25 हजार रुपये रोख दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. “पैसे दिले नाहीत तर हातपाय तोडून कंपनीची वाट लावीन” अशी धमकी देत आरोपीने पुढे थेट 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे मुरुड परिसरात खळबळ उडाली असून, रेवदंडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
मांडल्यात कोट्यवधींच्या खंडणीचा थरार
