1 जूनपासून टी-20 विश्‍वचषकाचा थरार

भारत-पाकिस्तान 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये भिडणार
अमेरिका-कॅनडा यांच्यात सलामीचा सामना


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयसीसीने पुरुषांच्या टी-20 विश्‍वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा 1 ते 29 जूनदरम्यान 20 संघांमध्ये होणार आहे. 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. तर, भारत-पाकिस्तान महामुकाबला 9 जून रोजी रंगणार आहे.वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतील नऊ शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत प्रथमच 20 संघांचा समावेश करण्यात आला आहे. मागील 2021 आणि 2022 च्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत प्रत्येकी 16 संघ सहभागी झाले होते. दरम्यान, 45-45 सामने खेळले गेले. त्यानंतर 16 पैकी 8 संघांना सुपर-12 टप्प्यासाठी थेट प्रवेश मिळाला. तर, पात्रता फेरीतून 4 संघ सुपर-12 मध्ये पोहोचले होते. इंग्लंड हा गतविजेता आहे, तर भारताने यापूर्वी 2007 मध्ये स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

स्पर्धेचा सलामीचा सामना कॅनडा आणि अमेरिका यांच्यात होणार आहे. हा सामना 1 जून रोजी न्यूयॉर्कमध्येच होणार आहे. या स्पर्धेत 20 संघांमध्ये 29 दिवस एकूण 55 सामने खेळवले जातील, जे टी-20 विश्‍वचषकाच्या इतिहासात प्रथमच घडणार आहे. 1 ते 18 जून या कालावधीत ग्रुप स्टेजचे 40 सामने होतील. 19 ते 24 जूनदरम्यान सुपर-8 चे 12 सामने खेळवले जातील. पहिला उपांत्य सामना 26 जून रोजी गयाना येथे, तर दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी त्रिनिदाद येथे खेळवला जाईल. 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये अंतिम सामना होणार आहे.

कोणता संघ कोणत्या गटात
अ गट : भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब गट : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट : न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड गट : दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ
तीन टप्प्यात होणार स्पर्धा

लीग स्टेज : पहिला टप्पा 1 ते 18 जूनदरम्यान खेळवला जाईल. प्रत्येक गटातील संघ आपापसात एक-एक सामना खेळतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतील.
सुपर-8 : दुसरा टप्पा 19 ते 24 जूनदरम्यान खेळवला जाईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ येथे सहभागी होतील. एकूण आठ संघ प्रत्येकी एक सामना खेळणार आहेत. येथून अव्वल चार संघ बादफेरीत पोहोचतील.
बादफेरी : जे संघ सुपर-8 मध्ये चांगली कामगिरी करतील, ते उपांत्य फेरीत प्रवेश करतील. पहिला उपांत्य फेरीचा सामना 26 जूनला, तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना 27 जूनला होणार आहे. यानंतर उपांत्य फेरीतील दोन्ही विजेत्यांमध्ये 29 जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.
एका गटातील 2 संघ सुपर-8 मध्ये
अ गटाप्रमाणेच ब, क आणि ड गटातही प्रत्येकी 5 संघ आहेत. सर्व संघ आपापल्या गटात 4-4 सामने खेळतील. ग्रुप स्टेजच्या शेवटी, पॉइंट टेबलमधील टॉप-2 संघ सुपर-8 टप्प्यात जातील. या टप्प्यात, 8 संघ प्रत्येकी 4 च्या 2 गटात विभागले जातील. येथे दोन्ही गटातील अव्वल 2 संघांमध्ये उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. उपांत्य फेरीतील दोन विजेत्या संघांमध्ये 29 जून रोजी अंतिम सामना होणार आहे.
इंग्लंड-वेस्ट इंडिजला दोनदा विजेतेपद
भारताशिवाय पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांनीही प्रत्येकी 1 वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर वेस्ट इंडीज (2012 आणि 2016) आणि इंग्लंड (2010 आणि 2022) यांनी प्रत्येकी 2 वेळा टी-20 विश्‍वचषकावर कब्जा केला आहे. ही स्पर्धा आतापर्यंत 8 वेळा खेळली गेली आहे. ही स्पर्धा 9व्यांदा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळली जाणार आहे.
Exit mobile version