बोरपाड्यात थरारक घटना;आईसह पत्नी व मुलावर जीवघेणा हल्ला

कौटुंबिक वादातून घडला गुन्हा; आरोपी फरार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कौटुंबिक वादातूनच आईसह पत्नी व मुलावर कुर्‍हाडीने हल्ला केल्याची बोरपाडा येथे घटना घडली. घरातील कुटूंब प्रमुखाकडूनच जिवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. जन्मदात्या वयोवृध्द आईसह पत्नी, मुलगा व मुलीवर कुर्‍हाडीने हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने वयोवृध्द आईसह पत्नी व मुलगा गंभीर जखमी असून तिघेही अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

चंद्रकांत मानकर (55, रा.बोरपाडा, अलिबाग) असे या मारेकर्‍याचे नाव आहे. या इसमाला दारु पिण्याचे व्यसन आहे. तो गेल्या काही वर्षांपासून उसर येथील एचपी कंपनीत काम करीत आहे. मंगळवारी मध्यरात्री हा इसम दारु पिऊन आला. त्याने त्याची पत्नी चेतना व मुलगा रविराज यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. शाब्दिक वाद वाढल्याने तरुणाने तेथील पोलीस पाटील समीर पाटील यांच्या मदतीने अलिबाग पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र पोलीस वेळेत पोहोचू शकले नाहीत.

या संधीचा फायदा घेत चंद्रकांत याने घरातील माळ्यावर असलेली कुर्‍हाड आणून त्याचा मुलगा रविराज, पत्नी चेतना व वयोवृध्द आई लक्ष्मी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात लक्ष्मी मानकर यांच्या दोन्ही हाताला, चेतना मानकर व रविराज याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सिटीस्कॅन करण्यात आले. लक्ष्मी मानकर यांचे हात फॅ्रक्चर झाले असून चेतना मानकर यांच्या डोक्याला सात टाके पडले आहेत. तिघेही जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Exit mobile version