निवड चाचणीत कुमार-कुमारी गटाचा थरार

शिवकन्या मंडळाची दमदार कामगिरी; देवाडीकर चषकावर उमटवली मोहोर

| ठाणे | प्रतिनिधी |

ठाणे जिल्हा कबड्डी असो.च्या सहकार्याने ठाणे जिल्हा कुमार-कुमारी अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे अयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा डोंबिवली (पूर्व) व भिवंडी येथे पार पडत असून, शिवकन्या मंडळाने कुमारी गटाचा देवाडीकर चषक पटकविला आहे. तर, कुमार गटात श्री मावळी मंडळ, श्री विठ्ठल मंडळ, बॉस्को स्पोर्टस्‌‍, जय बजरंग व नव तरुण संघ उपउपांत्य पूर्व फेरीत धडक दिली.

डोंबिवली(पूर्व) येथील सौ. राजश्री काळे काकू क्रीडानगरीत सुरू असलेल्या कुमारी गटाच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या शिवकन्या मंडळाने राजर्षी शाहू महाराज मंडळाचे आव्हान 51-32 असे सहज परतवून लावत श्रमजीवी स्व. रमेश देवाडीकर चषकावर आपले नाव कोरले आहे. सावध सुरुवात करणाऱ्या शिवकन्या संघाने पूर्वार्धात 26-20 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात आपला खेळ अधिक गतिमान करत सामना सहज आपल्या बाजूने झुकविला. शेरीन फतेजा, योगिनी म्हात्रे यांच्या उत्तरार्धातील जोशपूर्ण खेळाला याचे श्रेय जाते. राजर्षीच्या ज्ञानेश्वरी रनटंकी, अनुष्का चव्हाण यांचा पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात कमी पडला. या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात शिवकन्याने नव तरुण मंडळावर 68-19 अशी, तर राजर्षी शाहुने रा. फ. नाईक वर 38-20 अशी मात करीत अंतिम फेरी गाठली होती.

तसेच, विजय क्लब मंडळाच्या सहकार्याने भिवंडी-काल्हेर येथे मंडळाच्या पटांगणावर सुरु असलेल्या कुमार गटाच्या बाद फेरीत श्री मावळी मंडळाने स्वामी विवेकानंद संघाचा 39-25 असा पाडाव केला. विश्रांतीला दोन्ही संघ 17-17 असे बरोबरीत होते. स्वरूप साळुंखे, स्वरूप कदम, आदित्य ठोंबरे श्री मावळी मंडळाकडून, तर यश पाटील, पियुष म्हात्रे यांनी पराभूत संघाकडून उत्कृष्ट खेळ केला. श्री विठ्ठल मंडळाने जॉयकुमार स्पोर्टस्‌‍ वर 38-31 असा विजय मिळविलो. बॉस्को स्पोर्टस्‌‍ने जय हनुमान मंडळाचा प्रतिकार 34-28 असा मोडून काढला. श्रावण तांबे, मयुरेश वाघ यांनी बॉस्को कडून, तर साहिल चव्हाण, तुषार मानकर यांनी श्री हनुमानकडून चमकदार खेळ केला. जय बजरंग, वाशिंद ने निखिल गायकरच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर जय हनुमान संघावर 40-27 अशी सहज मात केली. शेवटच्या सामन्यात नव तरुण मंडळाने वेताळ मंडळाला 33-32 असे चकवीत आपली आगेकूच केली. पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या वेताळने दुसऱ्या डावात कडवी झुंज देत लढत चूरशीची केली. दुर्गेश जाधव, माणिक गराडे नव तरुणकडून, तर भुगेंद्र जोशी, अमोल शिंदे वेताळ संघाकडून उत्तम खेळले.

Exit mobile version