| रायगड | प्रतिनिधी |
बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, व्यसनाधीनता, आर्थिक अडचणी, संशय, संवादाचा अभाव तसेच शारीरिक व मानसिक छळ यांसारख्या विविध कारणांमुळे सध्या विवाहित जोडप्यांमध्ये कलह वाढताना दिसत आहे. किरकोळ वादातून सुरू झालेले मतभेद अनेकदा गंभीर स्वरूप धारण करून थेट घटस्फोटापर्यंत पोहोचत असल्याचे चित्र सर्वत्र दिसते. अशा परिस्थितीत तुटण्याच्या मार्गावर असलेल्या संसारांना वाचविण्यासाठी रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने लोकअदालतीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतींमधून तब्बल 19 विवाहित जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात यश आले आहे. घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचलेली ही नाती समुपदेशन, संवाद आणि तडजोडीच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आली असून त्यामुळे संबंधित कुटुंबांचे भविष्य वाचले आहे.
अनेक वेळा छोटे गैरसमज, अहंकार, संवादाचा अभाव आणि बाह्य हस्तक्षेप यामुळे वाद अधिक तीव्र होतात. हे वाद वेळेत मिटवले गेले नाहीत, तर त्याचे रुपांतर न्यायालयीन लढाईत होते. अशा प्रकरणांमध्ये पती-पत्नी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल करतात. मात्र, अंतिम निर्णयापूर्वी ही प्रकरणे तडजोडीसाठी लोकन्यायालयात ठेवण्यात येतात. लोकअदालतीत न्यायालयीन वातावरणापेक्षा वेगळ्या, सौहार्दपूर्ण वातावरणात समुपदेशन केले जाते. दोन्ही पक्षांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले जाते. गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधला जातो, जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली जाते आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. याच प्रक्रियेतून वर्षभरात 19 पती-पत्नींमधील दुरावा दूर करण्यात रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला यश आले आहे.
लोकअदालतीतील वर्षभराचा तपशील
22 मार्च 2025 रोजी झालेल्या लोकअदालतीत 4 संसार जुळले. 10 मे 2025 रोजी 5 संसार पुन्हा एकत्र आले. 13 सप्टेंबर 2025 रोजी 5 संसार जुळविण्यात यश मिळाले. 13 डिसेंबर 2025 रोजी 5 संसार पुन्हा सुरळीत झाले. अशा प्रकारे वर्षभरात एकूण 19 संसार पुन्हा उभे राहिले.
गेल्या वर्षभरात झालेल्या 4 लोकअदालतींमध्ये आम्हाला 19 जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात यश आले आहे. त्याचप्रमाणे आता पुन्हा जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधिश राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन वर्षात 14 मार्च रोजी लोकअदालत होणार असून ज्या जोडप्यांना आपला संसार टिकविण्याची आशा आहे, त्यांनी या लोकअदालतीचा नक्कीच लाभ घ्यावा.
-तेजस्विनी निराळे,
सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड.







