तिबोटी खंड्या आला रे… हजारो किमीचा प्रवास करून रायगडात आगमन

पक्षीनिरीक्षक, पक्षीप्रेमींना पर्वणी

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

पावसाळा म्हणजे कोकणात रायगड जिल्ह्यात काही पक्ष्यांचा विशिष्ट विणीचा हंगाम असतो. त्यात तिबोटी खंड्या आणि नवरंग पक्षी विशेष आहेत. रंगीबेरंगी पक्ष्यांच्या दुनियेत तिबोटी खंड्या हा कोकणरत्न, कलर बॉम्ब, उडता इंद्रधनुष्य अशा वेगवेगळ्या नावांनी पक्षीप्रेमींमध्ये प्रचलित आहे. हजारो कि.मी.चा प्रवास करून तो जिल्ह्यात दाखल झाला आहे. पावसाळ्यात जंगलातील ओढ्यांजवळून आढळून येणार हा पक्षी पाहण्यासाठी पक्षी निरीक्षक व निसर्गप्रेमींची सध्या लगबग सुरु आहे, असे माणगावचे निसर्ग अभ्यासक आणि छायाचित्रकार शंतनु कुवेसकर यांनी सांगितले.

गेल्या एका दशकात निसर्ग छायाचित्रकारांमध्ये तिबोटी खांड्याचे भलतेच आकर्षण वाढले असून संपूर्ण भारतभरातून पर्यटक फक्त हा पक्षी पाहण्यासाठी पावसाळ्यात कोकणात येतात. पूर्वी चिपळूण व माणगावमध्ये हा पक्षी पाह्यण्यासाठी बरेच पर्यटक दाखल व्हायचे, परंतु आता मुंबईनजीक कर्नाळा, पुण्यानजीक ताम्हिणी तसेच तळकोकणातील अनेक ठिकाणी तिबोटी खंड्या निरीक्षणासाठी स्थानिक तरुण इको टुरिझम उपक्रम राबवतात, त्यामधून अनेक तरुणांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे.

रायगड जिल्ह्याचा पक्षी
या पक्ष्याच्या सुंदर दिसण्यामुळे आणि विशिष्ट जीवनशैलीमुळे याला रायगड जिल्ह्याचा पक्षी म्हणून बहुमान मिळाला आहे. शेतकर्‍यांना ज्याप्रमाणे पावसाच्या आगमनाची आतुरता असते, तशीच आतुरता पक्षीप्रेमी, पक्षीनिरीक्षक व छायाचित्रकार यांना परदेशी पाहुणा तिबोटी खंड्याची असते.

वैशिष्ट्यपूर्ण
पायाला तीन बोटे असल्यामुळे त्याला ती बोटी खंड्या असे म्हटले जाते. खंड्या पक्षी प्रजातींमधील भारतात आढळून येणारा हा सर्वात छोटा पक्षी असून, साधारण त्याचा आकार 14 सेमी इतकाच असतो. चमकदार गुलाबी, लाल, शेंदरी, पांढरा, निळा, काळा, आणि पिवळा अशा सप्तरंगानी नटलेला हा पक्षी जंगलातील छोटे ओहोळ, नदी-नाले यांच्या जवळ गर्द झाडीमध्ये दिसून येतो. आणि जेव्हा कोणाची चाहूल लागते, तेव्हा हा पक्षी शिळ मारत एवढ्या वेगाने उडत जातो की, पाहणार्‍याला जणूकाही गर्द झाडीमधून इंद्रधनुष्य उडत जात असल्याचा भास झाल्याशिवाय राहात नाही.

उन्हाळ्याच्या अखेरीस तिबोटी खंड्या दक्षिण भारतातून अगदी श्रीलंकेपासून विणीच्या हंगामासाठी कोकणात यायला सुरुवात होते. तिबोटी खंड्या जून ते सप्टेंबर हा कालावधी कोकणात असतो. त्यानंतर पिलांचे संगोपन करून पुन्हा पिलांसोबत दक्षिणेकडे स्थलांतर करतो. त्यातील काही पक्षी अनुकूल परिस्थितीत मुबलक पाणी असलेल्या काही विशिष्ट परिसरांमध्ये वर्षभरदेखील राहणे पसंत करतात, स्थलांतर करून जात नाही.

शंतनू कुवेसकर, पर्यावरण अभ्यासक, माणगाव
Exit mobile version