हाफ तिकीट, एसटी हाऊसफुल्ल

पहिल्याच दिवशी महिलांचा उदंड प्रतिसाद
| अलिबाग | भारत रांजणकर |
एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना आजपासून (शुक्रवार) कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाणार असून, रायगड जिल्ह्यात महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100 टक्के प्रवासी तिकीट दरात सवलत देते. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवासाची सुविधा गेल्या वर्षी 25 ऑगस्टपासून सुरु केली. या योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे सहा कोटी ज्येष्ठ प्रवाशांना झाला आहे. नवीन योजनेमुळेदेखील महामंडळाला कोट्यवधी रुपये शासनाकडून मिळणार आहेत. त्यातून महामंडळाला फायदा होईल.

या सरकारने महिला सन्मान योजनेंतर्गत एसटी महामंडळाच्या बसेसमधून महिलांना 50 टक्के बस तिकिटात सवलत देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिलांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे अलिबाग आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांनी सांगितले. प्रवासी महिलांनीसुद्धा या योजनेबद्दल सांगितले असून, या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेला घेता येईल. तसेच ज्या महिला कामानिमित्त नेहमी प्रवास करतात अशा महिलांना ही योजना खूप फायदेशीर ठरेल. राज्य सरकारला धन्यवाद देऊन महिला प्रवाशांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

तृप्ती नाईक लाभार्थी
अलिबागमध्ये तृप्ती नाईक या महिलेने सर्वप्रथम या योजनेचा लाभ घेत अलिबाग-पनवेल असा प्रवास केला. आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांनी त्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version