। नेरळ । वार्ताहर ।
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लावले जाणे हे काही अचानक घडलेले नाही. कर्जत विधानसभा मतदारसंघात घट्ट पाळेमुळे रोवून आपले स्थान मजबूत करणार्या महेंद्र थोरवे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सुरेश लाड यांच्याशी सामना करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या जाहीर मेळाव्याला कर्जत विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि पदाधिकारी यांची उपस्थिती राहिल्याने आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी किती कार्यकर्ते राहणार? याबाबत देखील मेळाव्याच्या निमित्ताने चर्चा सुरु झाली आहे.
2019 मध्ये तब्बल 30 हजारांच्या फरकाने महेंद्र थोरवे हे शिवसेना- भाजप- आरपीआय महायुतीचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर तीनवेळा आमदार राहिलेले सुरेश लाड यांचा राजकीय अस्त झाला होता. परंतु पक्षाने जिल्हाअध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याने सुरेश लाड हे आगामी काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असणार असा कयास बांधला जात होता. मात्र त्यानंतर प्रकृती अस्वस्थामुळे सुरेश लाड मागील काही महिने सक्रिय राजकारणापासून दूर होते. परंतु राज्य सरकार आणि सरकारमधील घटक पक्ष अडचणीत असताना राष्ट्रवादी काँगर् पक्षाचे नेते असलेले सुरेश लाड यांनी राज्यातील परिस्थिती नाजूक असताना राज्यसरकार मधील शिवसेना हा घटक पक्ष अडचणीत असताना शिवसेनेला हात देण्याचा प्रयत्न केला आहे. 22 जून पासून निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यात राज्याचे कोणत्याही खात्याचा कारभार नसलेले मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे सरकार खिळखिळे करण्यासाठी शिंदे कॅम्पमध्ये कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे हे देखील आहेत. त्यामुळे अशा प्रत्येक मतदारसंघात जाऊन पॅचअप भरून काढण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी कर्जत विधानसभा मतदारसंघाचा दौरा निश्चित केला.
कर्जत मतदारसंघ महेंद्र थोरवे यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून पुन्हा उभा केल्यानंतर त्यांच्या कर्जत मतदारसंघात 22 जून नंतर शुकशुकाट होता. त्यामुळे मुंबई बाहेर सर्वात आधी आदित्य ठाकरे यांनी कर्जत विधानसभा मतदारसंघात दौरा निश्चित केला. 27 जून रोजी जाहीर केलेल्या दौर्यासाठी किती शिवसैनिक उपस्थित राहणार याबद्दल शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यामुळे आपल्या आघाडी सरकारमधील मित्र पक्ष आणि हे सरकार अडचणीत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच राष्ट्रीय काँग्रेस यांच्याकडून शिवसेनेची साथ दिली जात आहे. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा ज्या नावाने रंगल्या होत्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्ह्याचे मावळते अध्यक्ष सुरेश लाड यांनी सोशल मीडियावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे कर्जतमध्ये स्वागत करणारे बॅनर दिसू लागले.
केवळ सोशल मीडियावर नाही तर आदित्य ठाकरे ज्या रस्त्याने कर्जत येथील सभास्थानी येणार होते त्या मार्गावर सुरेश लाड यांच्याकडून स्वागत करणारे फलक लावले गेले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हजारो कार्यकर्ते यांच्या सोशल मिडियाच्या अकाउंट चे स्टेट्स देखील सुरेश लाड यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे होते. त्यात कर्जतमध्ये आमदारांविरुद्ध फेसबुक पोस्ट करणार्या शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याने या मेळाव्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रायगड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे स्वतः जातीने उपस्थित राहून अंदाज घेत होते. त्यात आता हा मेळावा मोठ्या गर्दीत झाला असून मेळाव्यात सर्वांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्यासोबत एकनिष्ठ राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी काळात थोरवे हे कर्जत येथे आल्यानंतर त्यांच्याकडून मागील तीन वर्षे पक्ष बांधणी करण्यासाठी घेतलेली मेहनत यामुळे त्यांच्यासोबत किती शिवसैनिक असतील, हा प्रश्न निकाली निघणार आहे?
हे लक्षात घेऊ शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही अशी शपथ घेतली असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कदाचित कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी म्हणून सुरेश लाड त्यांना शिंदे गटाच्या उमेदवार महेंद्र थोरवे यांच्याविरुद्ध उभे केले जाण्याची शक्यता आहे. तशी राणीनीति आखली गेली असल्याचे बोलले जात असून बंडखोर पुन्हा आगामी निवडणुकी जिंकून विधानभवनात पोहचु नये, यासाठी कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत तूल्यबळ कार्यकर्ते सध्यातरी नाही. मात्र मधल्या काळात दगडापेक्षा वीट मऊ आणि ती मऊ वीट म्हणजे सुरेश लाड हे जाहीरपणे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सुरेश लाड आणि शिंदे गटाकडून थोरवे अशी लढत पुन्हा पहायला मिळणार आहे. परंतु शिवसेनेमधील बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर राष्ट्रवादीचे नेते सुरेश लाड यांनी पक्ष नेतृत्वाला विचारूनच लावले असणार आणि त्यामुळे आगामी काळात सुरेश लाड सक्रिय झालेले असतील असे बोलले जात आहे.