| लातूर | प्रतिनिधी |
लातूर जिल्ह्यात एक अत्यंत क्रूर आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. येथील वानवडा रस्त्यावर उभी असलेली एक स्कोडा कार शनिवारी (दि.13) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पेटताना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने आपत्कालीन क्रमांकावर माहिती दिल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. त्यांनतर गाडीचा तपास घेतला असता आतमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह जळून कोळसा झाल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते. त्यामुळे हा अपघात नसून पूर्वनियोजित आणि अत्यंत क्रूर घातपात असल्याचा पोलिसांचा संशय बळावला. प्रथमदर्शनी मृत तरूणाची ओळख पटली असून गणेश गोपीनाथ चव्हाण (35) असे त्याचे नाव आहे. तो एका खासगी फायनान्स कंपनीत लातूर डिव्हिजनचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. या हत्याकांडामागे अनैतिक संबंध, आर्थिक व्यवहार किंवा अन्य कोणताही गुन्हेगारी कट आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.







