मागील दोन दिवस वनविभाग आणि भाजप तालुकाध्यक्ष विनोद बाेभस्कर यांचा सहकारी आणि ग्रामस्थांसमवेत सक्त पहारा
चिपळुण | संतोष पिलके |
तालुक्यातील कौंढर ताम्हणे गावातील आग्रेवाडी येथील परिसरात मागील तीन दिवस सतत संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास वाघाचे दर्शन ग्रामस्थांना होत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेत चिपळूण भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष विनोद बोभस्कर यांनी तात्काळ ही गोष्ट वनविभागाच्या कानावर घातली. कोकण पट्ट्यात सहजासहजी पट्टेरी वाघ म्हणजे दुर्मिळच मात्र लोकांनी प्रत्यक्ष पट्टेरी वाघ पाहिल्याचे सांगितल्यानंतर वनविभागाने पुढील दोन रात्र दोन दिवस जिल्हा वन अधिकारी दिपक खाडे, उपविभागीय अधिकारी सचिन निलख, वृक्ष अधिकारी जयश्री कीर, वनपाल भोसले,वनरक्षक सुर्वे, शिंदे यांच्यासह चिपळूण भाजपा तालुकाध्यक्ष विनोद बाेभस्कर,प्रथमेश बाेभस्कर त्यांचे सर्व सहकारी आणि कौंढर ताम्हणे आगरवाडीचे सर्व ग्रामस्थ या वाघाच्या भीतीचे सावट दूर करण्यासाठी पहारा देत आहेत.
याबाबत जिल्हा वन अधिकारी श्री दिपक खाडे यांच्याकडे संपर्क केला असता पट्टेरी वाघाचे ग्रामस्थांनी खात्रीशीर सांगितले असले तरी या पट्टेरी वाघाचे कौंढर ताम्हणे आगरवाडी परिसरातील अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आगरवाडी परिसरात ज्या ठिकाणी वाघ दिसल्याचे सांगण्यात आले आहे त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले असल्याचे त्यांनी सांगितले.त्यानंतरच दिसणा-या वाघाच्या प्रजातीबाबत निश्चितपणे सांगता येईल.त्याच बरोबर वाघाचे अस्तित्व आणि त्यापासून बचावाकरता उपाय योजना यासाठी प्रबोधन म्हणून वनविभागाच्या दोन टीम या भागात काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रबोधन टीमच्या वतीने सायंकाळनंतर या परिसरात फिरताना समूहाने फिरावे. आपल्या जवळ बॅटरी आणि काठी घेऊनच बाहेर पडावे. गुरे गोठ्यात सुरक्षीतपणे बांधून गोठ्याचा दरवाजा व्यवस्थितपणे बंद करावा. पाळीव कुत्रे सायंकाळनंतर बाहेर सोडू नये अशा सुचना कौंढर ताम्हणे परिसरातील ग्रामस्थांना देण्यात येत आहेत. आपल्या भागात बिबटे आहेत मात्र पट्टेरी वाघाचे अस्तित्व अजून कुठे सिद्ध झाले नसल्याचे खाडे यांनी सांगितले.