वाघाची 5 कोटींची कातडी जप्त

आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त; सहा जणांना अटक

| पुणे | प्रतिनिधी |

पुणे सीमा शुल्क विभागाने वाघांची शिकार करून कातडी विकणारे मोठं रॅकेट उध्वस्त केले आहे. या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात या कातडीची किंमत पाच कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

नागपूर सीमा शुल्क विभागाने वाघाची कातडी विकणारा एक ग्रुप जळगावजवळ आल्याची माहिती पुणे सीमा शुल्क विभागाला दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार तपास करण्यासाठी 26 तारखेला पुण्यातून पथक निघाले. कारवाई करत सीमा शुल्क विभागाने सहा जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी सहा जणांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. तर, रहीम रफिक हा या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती मिळाली आहे.

ताब्यात घेण्यात आलेली कातडीची आंतराष्ट्रीय बाजारात 5 कोटी रुपये किंमत आहे. ही वाघीण पाच फूट लांब असून 4-5 वर्ष वय असल्याचा अंदाज आहे. सीमा शुल्क विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या तस्करांनी एका वनगाईला विष देऊन ठार मारले आणि ती गाय वाघाच्या तोंडी दिली. ती गाय वाघाने खाल्ल्याने वाघाचा त्यामध्ये मृत्यू झाल्याचे तपासातून उघडकीस आले आहे.

पुणे सीमा शुल्क या प्रकरणी अधिकचा तपास करत असून यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे, कोणतं रॅकेट कार्यरत आहे याची माहिती घेत आहे.

Exit mobile version