पर्यावरणाच्या रक्षणासाठी कर्जतकरांचे धरणे आंदोलन
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात प्रस्तावित आणि सुरू असलेल्या विविध धरण, वीज व औद्योगिक प्रकल्पांविरोधात सोमवारी कर्जतमध्ये नागरिकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला. “विकास हवा पण विनाश नको”, “कर्जत वाचवा, निसर्ग वाचवा” अशा घोषणांनी टिळक चौक परिसर दणाणून गेला.
कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समिती यांच्या वतीने आयोजित आंदोलनात तालुक्यातील विविध गावांतील नागरिक, शेतकरी, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी कोंढाणा, पोशिर, शिलार, टाटा, टोरेंट, पाली-भूतिवली तसेच रेल्वे कारशेड प्रकल्पांमुळे हजारो एकर जंगल, शेती आणि नैसर्गिक साधनसंपत्ती धोक्यात आल्याचा आरोप केला. विशेषतः टोरेंटच्या प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुमारे 600 एकर जंगल आणि अडीच लाखांहून अधिक झाडांची कत्तल होणार असल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
कर्जतची ओळख ही हिरवेगार डोंगर, नद्या, जंगल आणि पर्यटनावर आधारित आहे. पर्यटन व्यवसायावर हजारो स्थानिक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असून, मोठ्या प्रकल्पांमुळे हा संपूर्ण पर्यावरणीय आणि आर्थिक समतोल बिघडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. आंदोलनकर्त्यांनी ‘मिनी माथेरान’सारखे पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प उभारल्यास स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल आणि निसर्गही जपला जाईल, अशी भूमिका मांडली. ‘एकदा नष्ट झालेला निसर्ग पुन्हा उभा राहात नाही,’ असा इशाराही यावेळी देण्यात आला.
कर्जतसमोरील प्रमुख प्रकल्प आणि प्रश्न
टोरेंट प्रकल्प
पाली-साई डोंगर आणि ढाक परिसरात प्रस्तावित 3000 मेगावॅट क्षमतेच्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुमारे 932 एकर जमीन लागणार असून, त्यातील 600 एकर वनक्षेत्र आहे. लाखो झाडांची तोड, वन्यजीवांवर परिणाम आणि पर्यावरणीय हानीची भीती व्यक्त केली जात आहे.
पोशिर धरण
सुमारे 5400 एकर क्षेत्र बाधित होणाऱ्या या प्रकल्पामुळे अनेक गावे आणि हजारो कुटुंबांवर विस्थापनाचे संकट आहे. प्रकल्पातील पाणी मुंबई महानगर क्षेत्रासाठी वापरले जाणार असल्याने स्थानिकांना फायदा काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिलार धरण
पनवेल आणि नवी मुंबईसाठी प्रस्तावित या धरणामुळे मोठ्या प्रमाणावर वनजमीन आणि शेती बाधित होणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
टाटा पंप स्टोरेज प्रकल्प
भिवपुरी परिसरात सुरू असलेल्या नव्या जलविद्युत प्रकल्पामुळे सुरुंगस्फोट, घरांना तडे आणि जंगलतोड होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रेल्वे कारशेड
भिवपुरी ते कर्जतदरम्यान उभारल्या जाणाऱ्या कारशेडमुळे काही गावांमध्ये पुरस्थिती निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला. या प्रकल्पाचा स्थानिकांना थेट लाभ नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
