महाविकास आघाडी आढावा बैठक संपन्न
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरात अनेक बंधने असून पर्यावरण नियम पाळून येथील विकास साधण्यासाठी आपण कालबध्द कार्यक्रम हाती घेणार असल्याचे आश्वासन मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी दिले. माथेरानमध्ये महाविकास आघाडीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी वाघेरे पाटील बोलत होते.
माथेरानमधील प्रीती हॉटेलमध्ये आयोजित आढावा बैठकीत व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार संज्योग वाघेरे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा प्रमुख सुरेश टोकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा नितीन सावंत,शिवसेना तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, महिला आघाडी जिल्हा संघटक सुवर्णा जोशी, शेकाप तालुका अध्यक्ष श्रीराम राणे, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, प्रेरणा सावंत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आढावा बैठकीचे प्रास्ताविक शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख प्रसाद सावंत यांनी केले. त्यावेळी त्यांनी नेरळ माथेरान मिनी ट्रेन मार्गाचे विद्युतीकरण करण्यात यावे आणि जेणेकरून या मार्गावर गाड्यांची संख्या वाढावी अशी मागणी केली. माथेरानमध्ये येण्यासाठी पर्यायी मार्ग बनवावा तसेच जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याबाबत उपाययोजना करण्यात यावी अशी सूचना केली.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी यावेळी बोलताना माथेरानचे आणि माझे 25 वर्षाचे नाते आहे. त्यातून माथेरानबाबत जिव्हाळा निर्माण झाला आहे. माथेरानमधील समस्या सोडविण्यासाठी माझा कायम प्रयत्न राहिला आहे. माणसाची काम करण्याची धडपड ही पक्ष विरहित मैत्री राहिली आहे. शहरात येण्यासाठी पर्यायी रस्ता होण्यासाठी माझा प्रामुख्याने प्रयत्न राहील आणि वर्षभरात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. माथेरानमधील जमिनीची धूप थांबविण्यासाठी पर्यावरण संस्था यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. तर माथेरान रोप वे चे काम कागदोपत्री कुठे अडकले आहे याचा अभ्यास केला जाईल आणि हा महत्वाचा प्रकल्प मार्गी लावला जाईल, असे आश्वासन दिले.
उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी यावेळी बोलताना आपण शिवसैनिक आपला पक्ष फुटल्यानंतर अहोरात्र मेहनत घेतलेली आहे.त्यामुळे आता आणखी महिना मशाल चिन्ह घरोघरी पोहचवण्याचे ध्येय महाविकास आघाडीने ठेवले आहे असे आश्वासन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वाघेरे पाटील यांना दिले. शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी जिल्हा संघटक सुवर्णा जोशी यांनी माथेरानमध्ये आरपीआय महाविकास आघाडीसोबत आहेत. ही आमच्या उमेदवार वाघेरे पाटील यांच्यासाठी जमेची आणि खासदार होण्याचे दृष्टीने महत्वाची बाब आहे, असा विश्वास व्यक्त केला.
शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख कुलदीप जाधव, काँग्रेस शहर अध्यक्ष विजय कदम, शेकाप शहर चिटणीस उमेश कदम, आरपीआय माथेरान शहर अध्यक्ष अनिल गायकवाड, मनीषा शिंदे, युवासेना शहर अधिकारी निमेश मेहता यांनी उपस्थित लोकांचे स्वागत केले. तर माथेरान शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष झाल्याबद्दल माजी नगरसेवक शकील शेख यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शेकापचे ज्येष्ठ नेते पुंडलिक शिनारे यांनी यावेळी बोलताना शेतकरी कामगार पक्षाने माथेरानमधॅल राजकारण अनेक वर्षे पाहिले आहे. ही लढाई कुरुक्षेत्राची लढाई आहे. कौरवांचा पराभव करण्यासाठी आपण सर्वांनी स्वतः संजोग वाघेरे पाटील आहोत अशाप्रकारे मतदारापर्यंत पोहचावे अशी सूचना पुंडलिक शिनारे केली. श्रीराम राणे यांनी पाच पक्षांचे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने आणि जमिनीवर राहून आपल्या उमेदवाराला विजयी करायचे आहे, असे मत मांडले. आदिवासी सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष जैतू पारधी यांनी आपल्या संघटनेचे वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील आणि आघाडीला यांना जाहीर पाठिंबा दिला.