| पनवेल-आपटा | वार्ताहर |
आपटा दाभोळवाडी येथील एका वृद्ध महिलेचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अंतिम संस्कारासाठी गावातील स्मशानभूमीत नेण्यात आले असता अत्यंत हलाखीची व हृदयद्रावक परिस्थिती समोर आली. स्मशानभूमीच्या छतावर छप्पर नसल्याने भर पावसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. त्यामुळे ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीत प्रामुख्याने आदिवासी समाज मोठ्या संख्येने राहतो. मात्र, या वाड्याकडे आपटा ग्रामपंचायत जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भोवड यांनी केला आहे. त्यातच दाभोळवाडी येथील ज्येष्ठ महिला गिरजी गणा वाघे यांचे नुकतेच निधन झाले. येथील स्मशानभूमीला पत्रे नसल्याने नाहिलाजाने त्यांचे अंत्यसंस्कार भर पावसात करावे लागले. स्मशानभूमीत पत्रे किंवा कोणतीही छप्पर व्यवस्था नसल्यामुळे पावसात पार्थिव देह पूर्णपणे भिजला. कुटुंबीयांनी व आदिवासी बांधवांनी बाहेरून पत्रे आणून पार्थिवावर हाताने धरून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. शेवटचा संस्कार ही प्रत्येक व्यक्तीचा मानवी हक्क असून, तो सन्मानाने व्हावा, अशी समाजाची अपेक्षा असते. मात्र, या घटनेमुळे ग्रामपंचायत व्यवस्थेचे अपयश स्पष्ट झाले आहे. तर, आपटा गंगेची वाडी येथील स्मशानभूमिचीही हीच अवस्था आहे. त्यामुळे त्यांनाही मोठ्या हाल अपेष्टा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे एकीकडे विकासाच्या बाता मारणाऱ्या आपटा ग्रामपंचायतीचा विचित्र कारभार चव्हाट्यावर आल्याने आदिवासी समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी हा प्रश्न गंभीरतेने घेतला असून, जर लवकरात लवकर व्यवस्था न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.