। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील खांडस ग्रापंपंचायतीमधील चाफेवाडी येथील नळपाणी योजना जुलै 2023 मध्ये कार्यान्वित झाली असून उद्भव विहिरीमध्ये पाणी नसल्याने नळपाणी योजना बंद आहे. त्यामुळे तीन आदिवासी वाड्यांसाठी आता नवीन विहीर खोदल्या जात आहेत. जलजीवन मिशनच्या या अनागोंदी कारभाराबद्दल स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, सहा महिन्यात नळपाणी योजना पाच वाड्यांना पिण्याचे पाणी पुरवण्यास निष्फळ ठरत असल्याने जलजीवन मिशनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खांडस ग्रामपंचायतमधील चाफेवाडी आणि पाच वाड्यांसाठी जलजीवन मिशन मधून नळपाणी योजना राबविण्यात आली. त्यावेळी जुलै महिन्यात या नळपाणी योजनेचे उद्घाटन झाले आणि पाणी योजनेचे पाणी पाच आदिवासी वाड्यांमधील लोकांना मिळू लागले. मात्र, मार्च अखेरपासून या नळपाणी योजनेचे पाणी स्थानिक ग्रामस्थांना मिळाले नाही. त्यामुळे पादीर वाडी, वडाची वाडी आणि टेपाची वाडीमधील आदिवासी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हळ्यात कोरड्या असलेल्या चिल्लार नदीमध्ये डवरे खोदून पाणी भरून आपल्या घरी न्यावे लागते. त्यामुळे शासनाकडून या तीन आदिवासी वाडीमध्ये राहणारे आदिवासी ग्रामस्थांची गैरसोय लकसाहत घेऊन शासनाने या तीन वाड्यांसाठी नवीन विहीर मंजूर केल्या आहेत.