विरोधकांना तालावर नाचविण्याची वेळ आलीय – अ‍ॅड. मानसी म्हात्रे

| अलिबाग | प्रतिनिधी |

राज्यात 288 आमदार आहेत. त्यापैकी 24 महिला आमदारांचा समावेश आहे. ही खेदाची बाब आहे. विधानसभेत आमचा विचार कधी करणार, असा सवाल शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे केला. त्या पुढे म्हणाल्या, महिला शक्ती काय आहे, हे आता विरोधकांना कळणार आहे. त्यांना तालावर नाचविण्याची वेळ आली आहे. त्यांना महिला नामोहरम केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका अ‍ॅड. म्हात्रे यांनी केली.

यावेळी अ‍ॅड. म्हात्रे यांनी, मी सुरक्षित आहे, मी स्वयंपूर्ण होणार, मी सक्षम होणार अशी जिद्दी मनाशी बाळगून या मेळाव्यातून महिलांनी प्रवास करायचा आहे. हा एल्गार बचत गटाचा आहे. महिलांचा आवाज पोहोचू द्या. बहिणीबद्दल सहानुभूती असेल, तर महिलांना प्रतिनिधीत्व द्या, असा टोला सरकारला लगावला.
आज अलिबागसह मुरूड, आक्षी, नागाव या परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनातून रोजगाराचे साधन खुले करण्याबरोबरच बाजारपेठनिर्मितीची व्यवस्था नाही. त्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी विधिमंडळात लोकप्रतिनिधीच्या रुपाने महिलांचा आवाज जाणे गरजेचे आहे. तरच सर्वसामान्य महिलांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल. महिला स्वावलंबी व सुरक्षित ठेवण्यासाठी महिलांनी एकजूट होणे आवश्यक आहे. बचत गटांचे संघटन वाढवायचे आहे. अप्रवृत्तीविरोधात चर्चा होणे आवश्यक आहे. महिला, तरुणींना स्वरक्षणाचे धडे मिळाले पाहिजेत, त्या पद्धतीने काम करायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

Exit mobile version