। भंडारा । वृत्तसंस्था ।
मागील वर्षभरापासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत. शासनाने शाळा सुरु करण्याचे निर्देश दिले असले तरी बहुतांश भागात अद्याप शाळा सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील लहान मुले पैसे कसे कमविण्याचा विचार करुन पहाटे लवकरच उठून गावोगावी जाऊन ब्रेड पावाची विक्री करताना दिसत आहेत. शाळा बंद असल्याने घरी रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी काम धंदा करुन कुटुंबाला हातभार लावावा, या उद्देशाने हसण्या-खेळण्याच्या वयात हे विद्यार्थी कष्ट करत आहेत.
शाळेतच जायचं नाही म्हटल्यावर खेड्यातील विद्यार्थी दिवसभर घरी आहेत. मग रिकाम्या वेळेत खेळून-खेळून खेळणार किती? अशा स्थितीत भंडारा जिल्ह्यातील करडी, पांजरा (बोरी) परिसरातील काही शाळकरी मुलांनी ब्रेड विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. शाळा बंद असल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचे विदारक शैक्षणिक चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
विद्यार्थी हे शाळेचं भूषण विद्यार्थी शाळेत असले की शाळा जिवंत होते. पण कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी असलेल्या सायकलचा वापर करुन त्यांनी ब्रेड-पाव विकण्याचा धंदा सुरु केला आहे. काही शाळकरी मुले प्लास्टिक बॉक्स सायकलच्या मागे बांधून करडी येथे जातात. ब्रेकफास्ट म्हणून खाल्ला जाणारा डबल रोटी टोस्ट नावाने प्रसिद्ध असलेला ब्रेड (पाव) भल्या सकाळी सायकलवर स्वार होऊन गावागावांत, गल्लोगल्ली विकताना दिसत आहेत.