प्रेत चादरीत गुंडाळून नेण्याची वेळ

| पालघर | प्रतिनिधी |

वसई-विरार शहर महानगर पालिका, तहसिदार कार्यालय वसई आणि प्रांत कार्यालय वसई या तिन्ही शासकीय कार्यालयांचा वसई तालुक्यामधे समावेश आहे. गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम करण्याची जबाबदारी शासनाने या तिन्ही कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे दिली आहे. मात्र, या तिन्ही कार्यलयाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीची प्रेतयात्रा स्मशानभूमीपर्यंत चादरीत गुंडाळून नेण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळाले.

पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील वाघोली आदिवासी सोरटे पाड्यातील स्थानिक रहिवासी सुनील वाघमारे यांचा शनिवारी (दि.3) मृत्यू झाला होता. आदिवासी पाड्यात रस्ता नसल्यामुळे सुनील वाघमारे यांना रुग्णालयात नेण्यासाठी चादरीची झोळी करून नेण्याची वेळ आली होती. त्यानंतर रुग्णालयातून घरी आणि स्मशानभूमीपर्यंत त्यांची प्रेतयात्रा सुद्धा चादरीच्या झोळीतच काढण्यात आली. वसई-विरार शहर महानगर पालिका, प्रभाग समिती ‌‘ई’ कार्यालयातील सहाय्यक आयुक्त व वाघोली येथील कार्यालयातील अधिकारी व स्थानिक महसुल विभागाचे कर्मचारी यांच्या हलर्जीपणामुळे आदिवासी समाज्याची प्रेतयात्रा स्मशानभूमीत चादरी गुंडाळून नेण्याची वेळ आली असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. यामुळे आदिवासी एकता परिषद पालघरच्या जिल्हा अध्यक्ष दत्ता सांबरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

Exit mobile version