आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी
| पनवेल | वार्ताहर |
तळोजा एमआयडीसीतून हवेत सोडल्या जाणाऱ्या घातक वायूंमुळे तळोजा परिसरातील नदी, नाले प्रदूषित झाले आहेत. रात्रीच्या वेळी प्रदूषणाचा स्तर वाढत असल्याने रहिवाशांना घराची दारे-खिडक्या बंद करून राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनने मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला. यावेळी आंदोलनात रोडपाली, कळंबोली आणि खारघरमधील रहिवाशांबरोबर चिमुकल्यांची संख्या लक्षणीय होती.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधून रात्रीच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या वायूंमुळे तळोजा, खारघर, कळंबोली परिसरात मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. पहाटे तसेच रात्रीच्या वेळी प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास होत आहे. वायू प्रदूषणाविरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे वारंवार तक्रार करून देखील प्रशासन याबाबत कोणतीही ठोस पावले उचलत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे कर्ज घेऊन खारघरमध्ये घरे खरेदी करणाऱ्यांना दूषित हवेच्या वातावरणात वास्तव्य करावे लागत आहे. पण या विषयावर सिडको एकही शब्द काढत नाही. त्यामुळे एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाविरोधात सर्वांना एकत्र करून पुढच्या पिढीला वाचवण्यासाठी प्रदूषणाच्या विरोधात लढा देण्याचा संकल्प अध्यक्ष गिरीश जोशी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक सिंग यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात करण्यात आला. यावेळी मोर्चात लहान मुलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी लहान मुलांच्या हातातील फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
फलकांमधून वेधले लक्ष तळोजा एमआयडीसीमधून रात्रीच्या वेळी हवेत होत असलेल्या प्रदूषणाविरोधात सहभागी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या मोर्चात रोडपाली येथील सोसायट्यांमधील दीडशेहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यावेळी आम्हाला शुद्ध हवेत खेळायचे आहे, प्रदूषित नही शुद्ध हवा चाहिये, वातावरण को प्रदूषित करनेवाले को जनता माफ नहीं करेगी, जन जन का एकही सपना, प्रदूषण मुक्त हो शहर अपना, अशा फलकांमधून लक्ष वेधून घेत होते.
लहान मुलांचे भवितव्य धोक्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 15 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले मोठ्या प्रमाणात प्रदूषणाच्या विळख्यात दिवसागणिक अडकत चालली आहे. येणाऱ्या पिढीचे भविष्य सुद्धा यामुळे धोक्यात आले आहे. तसेच, गर्भवती महिलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रदूषणाविरोधात खारघर, कळंबोली, तळोजा, कामोठे, रोडपालीतील नागरिकांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली गेली.