कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
दिवाळी सण गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. रविवारी भाऊबीजेनिमित्त बहिणीला भेटण्यासाठी भाऊ निघाले. मात्र, त्यांच्यावर अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा, अलिबाग-पेण मार्गावर वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ आली. सकाळी अकरा वाजल्यापासून या मार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तीन ते चार किलोमीटरपर्यंत अंतरावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक झाली. दरम्यान, निश्चित स्थळी पोहोचताना भाऊरायांना दीड ते दोन तास उशीर झाल्याचे चित्र दिसून आले.
दिवाळीला 28 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली. दिवाळीची सुट्टी कुटुंबियांसमवेत घालविण्यासाठी मुंबई, पुणे येथील चाकरमानी गावी आले होते. तसेच पर्यटकदेखील जिल्ह्यात दाखल झाले होते. रविवारी (दि.3) भाऊबीजेसाठी भाऊ सकाळपासून घरातून बाहेर पडले. तसेच सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकही अलिबागमध्ये फिरण्यास आले. त्यामुळे अलिबाग-पेण, अलिबाग-रेवदंडा व अलिबाग-रोहा मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा दिसून आल्या. पर्यटकांसह भावांना त्यांच्या निश्चितस्थळी पोहोचण्याची घाई असल्याने जसा मार्ग मिळेल, त्या ठिकाणाहून जाण्याकडे भर देत होते. सकाळी अकरा वाजल्यापासून अलिबाग-पेण, अलिबाग-रोहा व अलिबाग-रेवदंडा मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. सहाण बायपास, रेवदंडा-अलिबाग, तसेच अलिबाग-पेण मार्गावरील पोयनाडजवळ दुपारचे तीन वाजून गेले तरीही लाडक्या भावांना व पर्यटकांना त्यांच्या निश्चितस्थळी पोहोचता आले नाही. वाहनांची वर्दळ वाढल्याने प्रवासी त्रस्त झाले होते. वाहतूक पोलिसांच्या नियोजनाच्या अभावाबाबत अनेकांनी संतापही व्यक्त केला.
नवनवीन कपडे परिधान करून निघालेल्या भावांना वाहतूक कोंडीमुळे रस्त्यात तासन्तास थांबावे लागल्याने त्यांच्या अंगाची लाही लाही झाली होती. ते घामाघूम झाले होते. काही प्रवाशांनी रस्त्यात उतरून दीन ते दोन किलोमीटरची पायपीट करीत त्यांच्या निश्चित स्थळी जाण्याचा प्रयत्न केला. ही वाहतूक कोंडी सुरळीत करताना पोलिसांची दमछाक उडाली.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्थानिकांचा प्रयत्न
अलिबाग-रोहा मार्गावरील बेलकडे फाट्यावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान रुग्णांना घेऊन एक रुग्णवाहिका त्या रस्त्यावरून आली. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पुढे जाणे शक्य नव्हते. अखेर स्थानिकांनी तसेच तेथील काही तरुणांनी पुढाकार घेत वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रुग्णवाहिकेला जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला.
अपुर्या मनुष्यबळाचा प्रवाशांना फटका
जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा निर्माण करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील वाहतुकीचे नियोजन केले जात आहे. चार वर्षांपूर्वी सुमारे 120 वाहतूक पोलीस कर्मचारी होते. आता या कर्मचार्यांची संख्या घटली असून, 75 वाहतूक पोलिसांच्या भरोवशावर जिल्ह्यातील वाहतुकीवर लक्ष ठेवण्याचे काम केले जात आहे. त्याचा फटका प्रवाशांना व पर्यटकांना बसत असल्याचे चित्र आहे.
जीपीएसचा वेश्वी, कुरूळकरांना त्रास
वाहनचालकांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचता यावे, यासाठी जीपीएस प्रणाली कार्यान्वित झाली आहे. मुंबई, पुणे येथील पर्यटक मुरूड, काशीद व नागावकडे जाण्यासाठी या प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. जीपीएसद्वारे वेश्वी व कुरुळ गावातून पर्यटक त्यांचे वाहन घेऊन जातात. त्याचा त्रास स्थानिकांना होत आहे. अरुंद रस्त्यामुळे गावात अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. रविवारी झालेल्या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास वेश्वी व कुरुळकरांना प्रचंड झाला.
जलमार्गाने प्रवास करणार्यावर भर
सुट्टीचा आनंद घेऊन पर्यटक रविवारी मुंबईकडे निघाले. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे पर्यटकांनी जलमार्गाने वाहतूक करण्यावर भर दिला. मांडवा बंदरासह अलिबागमधील खासगी बोटीच्या तिकीट कार्यालयासमोर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांसह पर्यटकांनी गर्दी केली होती.
अलिबाग-पेण मार्गावरील पोयनाड, बेलकडे ते अलिबाग आणि रेवदंडा मार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. वाहने संथ गतीने चालत आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करीत आहेत.
– श्री. लांडे, पोलीस निरीक्षक