। मुंबई । वृत्तसंस्था ।
कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य-औषध या क्षेत्रांत महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी, मराठी तरुणांना जगाच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी पुढाकार घ्या. एकमेकाला सहकार्य करत राज्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगभरातील उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना केले.
अखिल आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स परिवारासमवेत दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून संवाद साधताना ठाकरे बोलत होते. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमी परिवाराचे संयोजक संतोष करंडे (अमेरिका), ज्येष्ठ विचारवंत संदीप देसले (इजिप्त), अलअदिल ट्रेडिंग कंपनीचे प्रमुख, उद्योजक डॉ. धनंजय दातार (दुबई), उत्कर्ष बल्लाळ (ओमान), विशाल गायकवाड (रियाध), संजय पाटील (कतार), लेफ्टनंट कर्नल सचिन टिळेकर (ऑस्ट्रेलिया), तेजस्विनी डोळस (अबुधाबी), मृदुला जोशी (कॅनडा), धवल नांदेडकर (फुजैराह), प्रीती पाटील (ब्रिटन), प्रज्ञा आगवणे (शारजाह), ज्योती नेने-त्रिवेदी (केनिया), मोहम्मद नदीम (सौदी अरेबिया), डॉ. अनघा कुलकर्णी (बहारीन), सुशांत सावर्डेकर (दोहा), उल्का नागरकर (शिकागो) सहभागी झाले होते. जगाच्या कानाकोपर्यातून जय महाराष्ट्र ऐकू येत आहे, हा अंगावर रोमांच आणणारा क्षण आहे. मराठी माणसाने जग व्यापून टाकले आहे, हा अनोखा अनुभव आहे. जगभरातील मराठी माणूस राज्याच्या विकासासाठी पुढे येतो आहे, हे आशा पल्लवित करणारे आहे. तुम्ही जगभरात आपल्या बळावर स्थान निर्माण केले आहे. त्यांचा फायदा आपल्या मराठी मुलांना, तरुणांना व्हावा. त्यांना संघर्ष करावा लागू नये, त्यांची भविष्याची वाटचाल सुकर व्हावी यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी के ले. विदेशात भविष्याची चाहूल लवकर लागते. त्या दृष्टीने पावले उचलली जातात. त्या अनुषंगाने आपला त्या-त्या क्षेत्रातील अनुभव-अभ्यास राज्यालाही उपयुक्त ठरू शकतो, असेही ठाकरे यांनी सांगितले.
उद्योगमंत्री देसाई म्हणाले, आपण सर्वांनी सातासमुद्रापार जाऊन महाराष्ट्राची मुद्रा उमटवली आहे. तिथे काम करताना, मातृभूमीचे ऋण, ऋणानुबंध विसरलेला नाहीत, हे महत्त्वाचे आहे. अनिवासी महाराष्ट्र म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहेत. करोनाकाळातही राज्यातील उद्योग, व्यापाराची चक्रे अविरत सुरू राहिली. जगभर विखुरलेल्या उद्योजकांच्या कल्पनांचे, संकल्पनांचे स्वागतच आहे. उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीसाठी राज्यात स्वागत असल्याचे देसाई यांनी सांगितले.