माणगावमध्ये क्रिकेटसाठी मैदान देणार- तांबे

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यात क्रिकेटसाठी कुठेच चांगलेसे मैदान नाही. क्रिकेटच्या खेळांसाठी तालुक्यातील खेळाडूंचा वाढता उत्साह पाहता तालुक्यात क्रिकेटसाठी खेळाडूंना चांगले मैदान उपलब्ध करण्यासाठी शासनामार्फत आपण सर्वांनी निश्‍चितच प्रयत्न करू, असे रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज तांबे यांनी क्रिकेट खेळाडूंना मार्गदर्शन करताना जावळी येथे बोलताना आश्‍वासित केले.

तालुक्यातील श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन माणगाव यांच्या सौजन्याने शिवगर्जना क्रिकेट क्लब कळमजे यांनी जावळीच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उदघाटन रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज तांबे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपस्थित खेळाडूंना त्यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी शशिकांत वाढवळ, सुजित वाढवळ, स्वप्नील शिर्के, संभाजी गायकवाड, समीर सकपाळ, संजय शिंदे, शैलेश शिंदे, अभिजित जाधव, अभिजित तेटगुरे, प्रतीक पाटील, संजू धामणे, मिलिंद शिर्के, अमोल वाढवळ, राहुल जाधव आदींसह क्रिकेट शौकीन व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पंकज तांबे पुढे म्हणाले, चांगली असोसिएशन आपण सर्वांनी तयार केली आहे. नव वर्षाचा आज पहिला दिवस. नवीन वर्षाच्या या पहिल्या दिवशी क्रिकेट खेळून आपले शरीर तंदरुस्त ठेवणे हा त्यामागचा भाग असू शकतो. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता आपण सर्व खेळाडूंनी टेनिस बॉल क्रिकेटबरोबरच सिझन बॉल क्रिकेटकडे लक्ष देऊन सिझन बॉलचा सराव करावा. माणगावात 30 एकर जागेत कोकण विभागीय क्रीडा संकुल साकारणार आहे. याठिकाणी क्रिकेटला किती स्थान आहे हे माहित नाही. परंतु आपण क्रिकेटसाठी मैदान मिळावे यासाठी शासनाला विनंती करून जागा मिळवू, असे तांबे यांनी खेळाडूंना आश्‍वासित करीत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version