टॉवरवर अडकलेल्या अजगराला वाचवायला सर्पमित्रांनी लावली जीवाची बाजी

| खोपोली | वार्ताहर |
खोपोलीतील महिंद्रा सॅनियो ( मस्को ) कंपनीतील पॉवर स्टेशनच्या आवारात दिनांक 5 जुलै 2022 रोजी रात्री 11.00 वाजताच्या सुमारास अजगर जातीचा साप 100 KV अर्थात 1लाख व्होल्टेजच्या टॉवरवर चढताना कामगारांना दिसला. मात्र तो सकाळ पर्यंत काही खाली उतरला नाही. त्याला कावळे आणि इतर पक्षांनी टोचून त्रास देण्यास सुरूवात केली होती. या संदर्भात कंपनीतील कर्मचारी नागेश गडदे यानी दिनांक 6 जुलै रोजी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर आणि सुनील पुरी यांच्याशी संपर्क साधला. त्या दोघांनी सर्पमित्र अमोल ठकेकर आणि दिनेश ओसवाल यांच्यासोबत घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्या अजगराला खाली उतरणे अशक्य होत असल्याची जाणीव झाली. तो अजगर ज्या ठिकाणी होता त्यापासून अवघ्या काही फुटाच्या अंतरावरून 1 लाख व्होल्टेजची हाय टेन्शन वाहिनी जात होती त्यामुळे कधी काहीही होईल याची धास्ती होती.

सर्पमित्रांची धडपड आणि त्या अजगराची अवस्था लक्षात घेऊन मस्को व्यवस्थापनाने सदर पॉवर स्टेशन काही वेळासाठी बंद केले. त्या ठिकाणी खोपोली नगरपालिकेचे फायर ऑफिसर हरी सूर्यवंशी यांनी देखील धाव घेतली. सुनील पुरी यांनी सुरक्षेची साधने घेऊन टॉवरचे टोक गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ऊंचीवर अजगराला रेस्क्यू करण्या इतपत सुरक्षित जागा नव्हती. सर्पमित्र आणि अजगराचा देखील अपघात होऊ शकला असता. त्यामुळे रिस्क घेणे जिकरीचे होते शेवटी सुनील पुरी खाली उतरले. हे सर्व करत असताना साधारणतः दोन तास गेले. मस्को कंपनीत उद्भवलेल्या तांत्रिक कारणाने त्या ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू करणे गरजेचे होते. त्यामुळे पुन्हा काही वेळानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला.

दुपारी तीन वाजता ठरल्याप्रमाणे पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. त्यावेळी सुनील पुरी, दिनेश ओसवाल, अमोल ठकेकर, गुरुनाथ साठेलकर या सर्पमित्रांच्या मदतीला नवीन मोरे, अमोल कदम, शुभम कंगळे, सोनू पवार यांच्यासह खोपोली अग्निशमन दलाचे प्रमुख हरी सुर्यवंशी, मोहन मोरे आणि त्यांचे सहकारी देखील आले.पॉवर सप्लाय बंद केल्या नंतर साधारणता 60 फुटाच्या पेक्षाही ऊंच असलेल्या त्या टॉवरवर खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वॉटर गनने पाण्याचा मारा सुरू केला. टॉवरच्या खाली सर्व मित्रांनी त्या अजगराला झेलण्याची तयारी केली. त्यासोबत सुनील पुरी यांनी टॉवरवर चढण्याची तयारी ठेवली. मात्र पाण्याच्या माऱ्याने अजगराने हालचाल सुरू केली आणि क्षणभरात तो वरुन खाली कोसळला. खाली त्या क्षणाची आशंका असणाऱ्या सर्वांनी त्या अजगराला अलगद झेलले आणि सुरक्षित पकडले. ज्याच्यासाठी हा अट्टाहास सुरू होता त्याची यशस्वी सांगता झाली.

सरपटणाऱ्या प्राण्यांमधील ए ग्रेडचा समजला जाणारा अजगर जातीचा साप सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यासाठी मस्को कंपनीचे अधिकारी राकेश रोशन, संतोष मडीवळेकर, अभिजीत कोथावडेकर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यानी फार मोलाची भूमिका बजावली. सर्वांच्या प्रयत्नाने एक अविस्मरणीय असे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले.

Exit mobile version