एमजीएम महाविद्यालयाचा जनजागृती उपक्रम
| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |
जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त एमजीएम दंत महाविद्यालय व रुग्णालय, तसेच नवी मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभागातर्फे तुरमाळे गावात तंबाखू व निकोटीन व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम महाविद्यालयाची कार्यकारी समिती, तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र आणि उन्नत भारत अभियान विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.
महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. श्रीवल्ली नटराजन तसेच सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभागप्रमुख व उन्नत भारत अभियान समन्वयक डॉ. वैभव ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात पार पडला. यामध्ये प्राध्यापक, इंटर्न, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी जनजागृती फलक हातात घेऊन गावातून रॅली काढली. घोषणाबाजी करत नागरिकांशी थेट संवाद साधून तंबाखू सेवनामुळे होणारा मुखाचा कर्करोग तसेच इतर गंभीर आजारांविषयी माहिती देण्यात आली. तंबाखू उद्योगांकडून वापरण्यात येणाऱ्या आकर्षक प्रचार तंत्रांमागील वास्तव नागरिकांसमोर मांडत तंबाखूमुक्त जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात जनजागृती रॅली, सांस्कृतिक सादरीकरण, माहिती पत्रकांचे वितरण, तंबाखूमुक्तीची शपथ, जनजागृती स्टिकर वाटप, मानवी साखळी, स्वाक्षरी मोहीम तसेच तंबाखूजन्य पदार्थांचा त्याग करण्यासाठी प्रेरणा देणारे उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात डॉ. भारत गुप्ता, डॉ. स्वाती सिंह, डॉ. श्रुती एन.के., तसेच शिक्षकेतर कर्मचारी प्रियांका जाधव यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थी समितीच्या सारा प्रधान, वैश्णवी येरणे, तेजस्वी सिंह, तुषार दाईघुडे आणि करिश्मा भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन करण्यात आले. तंबाखूजन्य आजारांविषयी जनजागृती करून निरोगी समाज घडविण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
