नवनाथ आरती मंडळाचा उपक्रम
| चौल । प्रतिनिधी ।
चौल-भोवाळे येथील दत्तमंदिराला मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी, दि. 5 डिसेंबर रोजी 108 प्रदक्षिणा घालण्यात येणार आहेत. सायंकाळी 5 वाजता या सोहळ्यास प्रारंभ होईल, अशी माहिती नवनाथ आरती मंडळ, चौलच्यावतीने देण्यात आली आहे.
दत्त मंदिराला 108 प्रदक्षिणा घालण्याचा सोहळा दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी वार्डे गुरुजी आरती मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतो. यावर्षी येत्या दि. 5 डिसेंबरला हा सोहळा पार पडणार आहे. दरवर्षी या कार्यक्रमास चौल पंचक्रोशी आणि विविध ठिकाणचे दत्तभक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्यानिमित्त दत्त महाराजांची एकत्रित प्रार्थना, महाआरती करण्यात येते. शेवटी महाप्रसादाचे वाटप करुन या सोहळ्याची सांगता होते. सध्या या सोहळ्याची जय्यत तयारी आयोजकांकडून सुरू आहे. या सोहळ्यास दत्तभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
12 डिसेंबरला दत्त परिक्रमा
दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्तमहाराजांचे स्वयंभू स्थान असलेल्या दत्त डोंगराला प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे. त्यानिमित्त पायी पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. परिक्रमेस दुपारी दोन वाजता दत्तमंदिरातून प्रारंभ होईल. स्वामी समर्थ मंदिरामार्गे चौल-सराई अशी मार्गक्रमणा करीत दत्त मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार त्यानंतर पायरीमार्गे मंदिराकडे मार्गस्थ होईल, असे नवनाथ आरती मंडळाच्यावतीने सांगण्यात आले आहे.