| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्ह्यात एक लाख दोन हजार 484 गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना बुधवारी (दि.27) होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी गणेश भक्त सज्ज झाले आहे. पूजनासाठी लागणारे साहित्य, फळे, फुले खरेदीसाठी मंगळवारी सकाळपासून बाजारपेठा सजल्या होत्या. पाऊस सुरु असतानादेखील बाप्पाच्या स्वागतासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदीचा उत्साह दिसून आला. बाजारपेठांमध्ये अफाट गर्दी झाली होती.
जिल्ह्यामध्ये एक लाख दोन हजार 484 गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. दीड दिवसाचे 25 हजार 551, पाच दिवसांचे एक हजार 322, सात दिवसांचे 56 हजार 468 तसेच अकरा दिवसांचे म्हणजे अनंत चतुर्दशीचे 18 हजार 211 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाने जोर धरला होता. काही भागांमध्ये पावसाची रिमझिम सुरु होती. परंतु, दुपारनंतर पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्यावर भक्तांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी करण्यास सुरुवात केली. बोलता-बोलता बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. बाप्पाचे आगमन तसेच प्रतिष्ठापना बुधवारी होणार आहे. त्यामुळे काहींनी मंगळवारी सायंकाळी गणेशमूर्ती घरी आणण्याचा प्रयत्न केला. काहीजण बुधवारी सकाळी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करणार असल्याचे सांगण्यात आले. गणपत्ती बाप्पा मोरया… असा जयघोष करीत बाप्पाचे स्वागत करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने यावर्षी नशामुक्तीसह बेटी बचाव बेटी पढाव, स्वच्छतेविषयी चलचित्राचे सादरीकरण करणार आहे. दीड दिवसांपासून पाच, सात व दहा दिवस वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत. पारंपरिक भजनांसह जाखडी नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे. वेगवेगळे सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
आज बाप्पाची प्राणप्रतिष्ठा
