आज विरोधात आहेत त्यांची घडणही शेकापमध्येच – आ.जयंत पाटील

द्वारकानाथ नाईक यांच्या माझ्या आठवणीतले भाऊ आणि कृतज्ञ मी कृतार्थ पुस्तकाचे प्रकाशन

अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

सर्वसामान्य माणुस उभा कसा करु शकतो हे स्व. प्रभाकर पाटील यांनी द्वारकानाथ नाईक यांच्या रुपाने दाखवून दिले. अष्टागरात पक्षाच्या तसेच आमच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार शेकापक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी काढले. आज राजकारणात शेकापक्षाच्या विरोधात असलेले लोक हे शेकापक्षानेच घडवलेले आहेत. आम्हाला आनंद होतो की आम्ही घडवलेले लोकं मोठे झाले. सांप्रतचे वातावरण बघताना माझ्या सारख्या राजकारण्याला देखील भीती वाटते की राजकारणात रहायचे की नाही? अशा परिस्थितीत कार्यकर्ते घेऊन काम करणे मोठे असल्याचे मत देखील आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य द्वारकानाथ कबन नाईक यांनी दिलेल्या माझ्या आठवणीतले भाऊ आणि कृतज्ञ मी कृतार्थ मी या त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष ल नी नातू आणि कृषीभूषण जयवंत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पंडित शेठ पाटील, आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, सुपर उत्पादक संघाचे अध्यक्ष रमेश नाईक, गजेंद्र दळी, रघुजीराजे आंग्रे, सुरेश खैरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अपेक्षा कारेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड आस्वाद पाटील, अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शंकरराव म्हात्रे, नंदकुमार मयेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, महादेव मुकादम, क्षात्रेक्य समाजाचे मुंबई अध्यक्ष जगदिश पाटील, माजी अध्यक्ष विजय पाटील, अलिबाग अध्यक्ष अविनाश राऊळ आदी उपस्थित होते.

इच्छा नसतातना देखील गोपिनाथ मुंडे यांनी आपल्याला आमदार होण्यासाठी तयार केल्याचे यावेळी आ. जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच कार्यकर्त्याला घडवले तर काय होऊ शकते हे दाखवून दिले असेही त्यांनी यावेळी नमुद केले. द्वारकानाथ नाईक यांनी आपल्या मनोगतात मी आयुष्यामध्ये पहिला शेतकरी होतो, दुसरा समाजसेवक होतो नंतर राजकारणी परंतु या सर्वांची जोड घेऊन जीवनामध्ये कधी अपयश आले नाही कारण माझे नशिब आणि पाटील घराण्याचा भक्कम पाठिंबा. आपण पाटील घराण्याचा सेवक म्हणूनच काम केले. मी कुठेही जाणार नाही माझ्या आयुष्यात पक्षाच्या लाल रंगाचे फार महत्व आहे. आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहीण्यासारखा असल्याचेही ते म्हणाले. माजी आमदार पंडीत पाटील यांनी आपल्या मनोगतात द्वारकानाथ नाईक यांच्या कार्याचा गौरव केला. कबन अण्णा म्हणजे निष्ठावंत कार्यकर्ते, श्रद्धा आणि सबुरी याची सांगड असलेल्या नाईक अण्णांनी समाजात कायम चांगले काम केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष ल नी नातू आपल्या मनोगतात म्हणाले की, द्वारकानाथ नाईक म्हणले निष्ठावंत आणि धडपडे कार्यकर्ते. हल्ली निष्ठा पटापट बदलत असतात मात्र द्वारकानाथ नाईक कायम एकनिष्ठ राहिले. तर कृषीभुषण जयवंत चौधरी यांनी आपल्या भाषणात द्वारकानाथ नाईक यांच्या कार्याचे भरभरुन कौतुक केले. नाईक अण्णांनी कायम दुःखीतांचे अश्रु पुसले. रमेश नाईक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक अण्णांची सुन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आश्‍लेषा नाईक यांनी तर सुत्रसंचलन आणि आभारप्रदर्शन राजिम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी केले. स्वागत तुषार नाईक, मृणाल नाईक, इशा नाईक यांनी केले. यावेळी आक्षी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नंदकुमार राऊळ आणि सर्व पदाधिकारी सदस्य यांनी द्वारकानाथ नाईक यांचा जाहीर सत्कार केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर गुंजार हा सांगितीक कार्यक्रम सादर करण्यात आला.

Exit mobile version