। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी आजच्या निकालाची सुनावणी हि एकूण 34 याचिकांच्या सहा गटात समावेश करून पार पडणार आहे. सुमारे 200 पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे 1200 पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे. परिणामी, सहा गटांतील निकालांचा केवळ सारांश वाचला जाईल आणि नंतर संपूर्ण निकालाची प्रत दोन्ही गटांना पाठवली जाणार आहे.
निकालाचे परिणाम १) पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल. २) सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा स्पष्ट होतील. ३) अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार हे स्पष्ट होतील. ४) राजकीय पक्ष व विधीमंडळ पक्ष यांच्या कार्यकक्षा स्पष्ट होतील.
निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचणार शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय अवघ्या तासांवर येऊन ठेपला आहे. दुपारी साडेचार वाजल्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात येईल. जवळपास एक ते दीड तास निकालाचे वाचन होईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचतील. या सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना नंतर दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा धक्का असेल. कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ 16 आमदार शिल्लक आहेत, त्यातील 14 अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो.