। जळगाव । प्रतिनिधी ।
डांभूर्णी शिवारातील एका शेतात वास्तव्यास असलेल्या मेंढपाळ कुटुंबातील दोन वर्षाच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात घबराट उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील डांभुर्णी शिवारात प्रभाकर चौधरी यांच्या शेतात मेंढपाळ कुटुंब काही दिवसांपासून वास्तव्यास आहे. शेतात सर्वजण निवांत झोपलेले असताना, बुधवारी (दि. 16) मध्यरात्री शेजारील केळीच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून रत्ना नावाच्या दोन वर्षाच्या बालिकेला उचलून नेले. गाढ झोपेत असलेली रत्नाची आई जिजाबाई रूपनर ही मुलीचा आवाज ऐकून जागी झाली. तिने मुलीचा जीव वाचविण्यासाठी जिवाच्या आकांताने आरडाओरड केली. परंतु, तोपर्यंत बिबट्या बालिकेला घेऊन अंधारात पसार झाला होता. मेंढपाळांनी लागलीच आजुबाजुच्या केळी बागांमध्ये बालिकेचा शोध घेतला असता काही अंतरावरच त्यांना शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेतील बालिकेचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला.