टोकण पद्धतीने भाताची लागवड यशस्वी

। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील चिरनेर मधीलपाडा येथे राहणार कृषी मित्र शेतकरी प्रफुल खारपाटील व प्रयोगशील शेतकरी बाळकृष्ण धनाजी मोकल यांनी मौजे चिरनेर येथील त्यांच्या भात खाचरातील शेतात एका एकरात टोकन पद्धतीने यशस्वी लागवड करून घेतली आहे. त्यांना अवघे 10 किलो बियाणे लागले. तर या पेरभात टोकन पद्धतीसाठी त्यांना केवळ 10 मजूर लागले.
तसेच त्यांच्या दुसर्‍या एका शेतात या दोन्ही शेतकर्‍यांनी ड्रम सिडरच्या सहाय्याने पेरणी करून घेतली. यासाठी त्यांना 20 किलो बियाणे पेरणीसाठी लागले. पारंपारिक पद्धतीने शेतीमध्ये शेतात शेण, पालापाचोळा आदींचा राब करून त्यानंतर नांगराच्या किंवा पॉवर टिलच्या सहाय्याने चिखल करून, चांगली मशागत करून, भाताची लावणी केली जाते. त्यामुळे माणसाचे श्रम, वेळ, खर्चीक पैशांची बचत होऊन चांगले भरघोस पीक घेता येते. यावेळी नऊ भाताच्या जातीचे बियाणे टोकन पद्धतीने पेरण्यात आले. यात लाल भात या भाताची प्रात्याक्षिकाद्वारे पेरणी करून घेतली.
दरम्यान कोकण कृषी विद्यापीठाचे बाळासाहेब सावंत, खारभूमी संशोधन केंद्र पनवेलचे शास्त्रज्ञ बोरसे, कृषी सहाय्यक अधिकारी उमेश गाताडी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली भाताच्या विविध जाती, संकरीत भाताची निर्मिती तसेच पेरभात टोकन पद्धतीची माहिती चिरनेर गावातील शेतकर्‍यांना देण्यात आल्याने भातपीक बहरले असल्याची माहिती कृषी सहाय्यकांनी दिली.

Exit mobile version