ट्रकच्या धडकेत टोलवसुली कर्मचारी ठार

| पनवेल | वार्ताहर |

रोडपाली येथील फुडलँड कंपनीसमोरील उड्डाणपुलावरुन भरधाव येणार्‍या ट्रकने शनिवारी सायंकाळी 32 वर्षीय टोल वसूल करणार्‍या कर्मचार्‍याला चिरडले. दोन वाहनांमध्ये हा कर्मचारी चिरडला गेला. घटनेनंतर धडक देणारा ट्रकचालक फरार झाला होता. ट्रकचालक कळंबोली पोलीस ठाण्यात हजर झाला. संदीप मिश्रा असे या मृत कर्मचार्‍याचे नाव आहे.

रोडपाली येथील फुडलँड कंपनीसमोरील उड्डाणपुलावर सायंकाळच्या सुमारास नेहमी वाहतूक कोंडी असते. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमधून एकाचवेळी सुटणार्‍या वाहनांमुळे ही कोंडी होते. या पुलावरुन विरुद्ध दिशेनेसुद्धा वाहने पळविली जातात. नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या मागणीनंतर पनवेलमधील वाहतूक कोंडीवर पोलिसांना सहकार्यासाठी पालिकेने वार्डनची नेमणूक वाहतूक नियमनासाठी केली आहे. रोडपाली चौकात हे वार्डनही पोलिसांकडून तैनात केले असतात. संदीप मिश्रा हे एका अवजड वाहनाकडील टोलची पावती तपासत असताना फुडलॅण्ड कंपनीसमोरील उड्डाणपुलावरुन आलेल्या ट्रकने संदीपला धडक दिली. या धडकेमध्ये संदीप दोन्ही ट्रकच्या मधोमध चिरडून घटनास्थळीच तो ठार झाला. टोलच्या इतर कर्मचार्‍यांनी संदीपला महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी संदीपला मृत घोषित केले. या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला होता. ट्रकचालक बिलाल अहमद हजरत अली याला पोलीसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी बिलाल अली याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Exit mobile version