। अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती आहे. जयंतीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यात महामानवाची 76 पुतळे असून 263 ठिकाणी प्रतिमा पुजन आणि 94 ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, रोहा अशा अनेक तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या संस्था, संघटना व मंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाणार आहे. अलिबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले जाणार आहे. अलिबाग नगरपरिषदेसह भारतीय बौध्द महासभा व बौध्दजन पंचायत समितीच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
अलिबाग तालुक्यातील महाजने, मल्याण, रेवदंडा, गोविंद बंदर, शास्त्रीनगर, कुरुळ, बेलकडे, रामराजसह जिल्हयातील रोहा, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड आदी ठिकाणी जयंती सोहळा साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यामध्ये 76 पुतळ्यांसह 263 प्रतिमांचे पुजन केले जाणार आहे. तसेच, यावेळी सामाजिक उपक्रमातून शाळकरी मुलांना शालेय साहित्य वाटप केले जाणार आहेत. गुणगौरव सोहळ्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. सायंकाळी 94 ठिकाणी मिरवणूका काढण्यात येणार आहेत.