उद्या महामानवाची 135वी जयंती

रायगडमध्ये मिरवणुका, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी 135 वी जयंती रायगड जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्हाभरात शेकडो ठिकाणी प्रतिमापूजन, मिरवणुका आणि विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध संस्था, संघटना आणि मंडळांच्या वतीने सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात तब्बल 295 ठिकाणी प्रतिमापूजन तर 110 ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. 14 एप्रिल 1891 रोजी जन्मलेल्या डॉ. आंबेडकर यांनी आपल्या बुद्धिमत्ता आणि शिक्षणाच्या जोरावर पीडित व शोषित घटकांना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केले. त्यामुळे त्यांची जयंती हा समाजातील वंचित घटकांसाठी उत्सवाचा दिवस म्हणून ओळखला जातो. जयंतीनिमित्त जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून भीम अनुयायांकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती. विविध सभा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

अलिबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे. अलिबाग नगरपरिषद, भारतीय बौद्ध महासभा आणि बौद्धजन पंचायत समिती यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग तालुक्यातील महाजने, मल्याण, रेवदंडा, गोविंद बंदर, शास्त्रीनगर, कुरुळ, बेलकडे, रामराज तसेच रोहा, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड आदी ठिकाणी जयंती सोहळा साजरा केला जात आहे.

जिल्ह्यातील 76 पुतळ्यांसह 295 प्रतिमांचे पूजन करण्यात येणार आहे. यावेळी सामाजिक उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, गुणगौरव सोहळे तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. सायंकाळी 110 ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार असून, काही ठिकाणी प्रतिमांची तर काही ठिकाणी पुतळ्यांची भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. तसेच 21 ठिकाणी इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नेरळ, खोपोली, रसायनी, पेण, मुरुड, पाली आणि महाड शहर येथे मोठ्या प्रमाणावर मिरवणुका काढण्यात येणार आहेत. जयंती उत्सव शांततेत पार पडावा यासाठी रायगड पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तात 81 पोलीस अधिकारी, 508 कर्मचारी, तीन आरसीपी दल, एक अतिशीघ्र कृती दल, 11 स्ट्रायकिंग फोर्स, एसआरपीएफचे एक पथक, 69 वाहतूक पोलीस आणि 385 होमगार्ड यांचा समावेश आहे.

Exit mobile version