गेल प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

| अलिबाग | प्रतिनिधी |
गेल कंपनी प्रशासनाच्या विरोधात संंयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीच्यावतीने उसर येथे गेल कंपनीसमोर गेल्या पंधरा दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. अनेक दिवस उलटूनही कंपनी प्रशासनाने कोणतीही भुमिका घेतली नसल्याने प्रकल्पग्रस्त, शेतकरी कामबंद आंदोलनाच्या पावित्र्यात होते. मात्र जिल्हा प्रशासनाने मध्यस्थीची भूमिका घेत मंगळवारी (दि.3) सकाळी अकरा वाजता बैठक बोलावली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेला आहे.

प्रकल्पग्रस्तांना गेल कंपनीत कायम स्वरुपी नोकरी देण्याचा लेखी करार करावा, प्रकल्पासाठी संपादित झालेल्या जमीनींच्या 15 टक्के विकसित जमीन प्रकल्पग्रस्तांना द्यावी. सर्व प्रकल्पग्रस्तांना त्वरित प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात यावा. 247 शेतकऱ्यांच्या वारसांना कंपनीमध्ये सामावून घ्यावे, प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना प्राधान्याने नोकरी द्यावी. त्यानंतर परिसरातील गावांमधील तरुणांना नोकरी मिळावी. ज्या प्रकल्पग्रस्तांचे वारस नाहीत, त्या प्रकल्पग्रस्तांना शेवटपर्यंत वेतन देण्यात यावे. प्रकल्पासाठी लागणारा माल वितरीत करण्यासाठी प्रकल्पग्रस्त, स्थानिकांना प्राधान्य द्यावे. दरवर्षी 20 प्रकल्पग्रस्तांना कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घ्यावे.कंपनीतील सीएसआर निधीचा वापर उसर, घोटवडे, कुणे, नाईक कुणे, कंटक कुणे, मल्याण येथील गावांतील प्रकल्पग्रस्तांबरोबर अन्य गावांत पाणी, रस्त्याची कामे करावीत, अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत.

यासाठी 15 सप्टेंबरपासून शेतकरी, प्रकल्पग्रस्तांनी साखळी उपोषण सुुरू केले आहे. नीलेश गायकर, निखिल पाटील, योगेश गुजर यांच्या पुढाकाराने हा लढा सुरु केला आहे. पंधरा दिवस उलटूनही कंपनी प्रशासनाने कोणतीही भुमिका घेतली नसल्याने उपोषणकर्ते काम बंद आंदोलन करण्याच्या भुमिकेत होते. मात्र हे आंदोलन तूर्तास थांबवून प्रश्नांची सोडवणूक बैठकीच्यामार्फत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मध्यस्थीची भुमिका घेतली आहे. पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन कक्षामध्ये मंगळवारी सकाळी अकरा वाजता बैठक होणार असल्याचे पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले आहे.

शेकापमुळे मिळाले उपोषकर्त्यांना बळ
गेल कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरु केले. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सुरुवातीपासूनच उपोषणकर्त्यांना पाठींबा दिला. वेळोवेळी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना बळ देण्याचे काम केले आहे.

Exit mobile version