उद्या मध्यरात्री नेरळमध्ये ध्वजारोहण

निवृत्त जवान फडकविणार तिरंगा

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ येथील हुतात्मा चौकामध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटाने तिरंगा झेंडा फडकावून साजरा केला जातो. यावर्षी भारतीय सेनेतील निवृत्त जवान कुमार गोटीराम जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणारी स्वराली नितीन थोरात आणि जागतिक युवा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी परदेशात जात असलेली अमृता ज्ञानेश्वर भगत यांचा सन्मान ध्वजारोहणानंतर केला जाणार आहे.

रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लब यांचा उपक्रम असलेली हुतात्मा स्मारक समिती कार्यरत आहे. कर्जत तालुक्यातील हुतात्मे भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या देशसेवेची कार्याची देशकार्याची माहिती व्हावी यासाठी गेली 18 वर्षे कार्यरत आहे. हुतात्मा स्मारक समितीने पुढाकार घेऊन कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर माथेरान नाका येथे हुतात्मा चौक उभारला आहे. तेथे भारताचा स्वातंत्र्यदिन मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटाने तिरंगा झेंडा नेरळ गाव आणि परिसरातील शेकडो तरुणांच्या उपस्थितीत फडकावून साजरा केला जातो. मध्यरात्रीचे ध्वजारोहण दरवर्षी स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय नातेवाईक तसेच लष्करातील जवान यांच्या हस्ते केले जाते. यावर्षी नेरळ गावातील आणि भारतीय सेनेतून काही दिवस आधी सेवानिवृत्त झालेले जवान कुमार जाधव यांच्या हस्ते फडकावला जाणार आहे.

या कार्यक्रमात नेरळ गावातील एलएईएस शाळेतील स्वराली नितीन थोरात ही 97.60टक्के गुण मिळवून पहिली आली असून, तिचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच अमृता ज्ञानेश्वर भगत ही जागतिक युवा पॉवर लीफ्टींग स्पर्धेत सहभागी होत असून, 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा रोमानिया देशात होत आहे. या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हुतात्मा स्मारक समितीचे हुतात्मा चौकातील मध्यरात्री होणारे हे 18 वे वर्षे आहे. या कार्यक्रमाचे निमित्ताने हुतात्मा चौक ते नेरळ गाव आणि पुन्हा हुतात्मा चौक अशी मशाल फेरी काढली जाणार आहे.

Exit mobile version