सन मराठी वाहिनीतील लोकप्रिय कलाकारांची उपस्थिती
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या सन्मानाची परंपरा जपणाऱ्या रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिक कृषीवलतर्फे यंदाही भव्य हळदीकुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मकरसंक्रांतीनिमित्त हा हळदीकुंकू समारंभ शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी चार ते सात या वेळेत अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात संपन्न होणार असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे दैनिक कृषीवल सामाजिक भान जपत तळागाळातील सर्व घटकांतील महिलांना या सोहळ्याच्या निमित्ताने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. हळदीकुंकू हा प्रत्येक महिलेसाठी सन्मान व सौभाग्याचा प्रतिकात्मक दिवस मानला जातो. हीच परंपरा जपत कृषीवलने गेल्या 31 वर्षांपासून मकरसंक्रांतीनिमित्त हा उपक्रम सातत्याने राबविला आहे. या सोहळ्यास कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात सुरुवात होणार आहे.
विशेष आकर्षण म्हणून सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमधील कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये ‘हुकुमाची राणी’ मालिकेतील वैभवी चव्हाण (राणी), अक्षय पाटील (इंद्र), ‘इन्स्पेक्टर मंजू’ मालिकेतील मोनिका राठी (मंजू), वैभव कदम (सत्या) तसेच ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेतील योगिता चव्हाण (अर्पिता) आणि अंबर गणपुले (समीर) यांचा समावेश आहे. महिलांसाठी पर्वणी ठरणाऱ्या या हळदीकुंकू सोहळ्यासाठी भव्य व सुसज्ज असा मंडप उभारण्यात आला असून, प्रशस्त सभागृहात कार्यक्रम पार पडणार आहे. ग्रामीण व शहरी भागातून येणाऱ्या महिलांना या सोहळ्याचा आनंद घेता यावा, यासाठी आयोजकांकडून उत्तम व्यवस्थापन करण्यात आले आहे.





