| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषद सात व पंचायत समिती 14 मतदारसंघांतील शेतकरी कामगार पक्षासह महाविकास आघाडीचे उमेदवार उद्या मंगळवारी (दि.20) उमेदवारी अर्ज अलिबागचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणार आहेत.
रायगड जिल्हा परिषद 59 व पंचायत समितीच्या 118 जागांसाठी निवडणूक होणार आहे. अलिबाग तालुक्यामध्ये शहापूर, आंबेपूर, आवास, थळ, चेंढरे, चौल व कावीर असे सात जिल्हा परिषद गट तसेच वैजाळी, शहापूर, आंबेपूर, रुईशेत भोमोली, आवास, किहीम, थळ, वरसोली, चेंढरे, आक्षी, रेवदंडा, चौल, काविर, रामराज असे 14 पंचायत समिती गण आहेत.
जिल्हा परिषद गटातील शहापूर, आवास, चौल या ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण आहे. आंबेपूर, थळ येथे सर्वसाधारण महिला, कावीर येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग व चेंढरे येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षण आहे. तसेच अलिबाग पंचायत समिती गणातील वैजाळी, शहापूर, आंबेपूर, आक्षी, कावीर येथे सर्वसाधारण आरक्षण आहे. किहीम, चेंढरे, चौल, रामराज येथे सर्वसाधारण महिला, रेवदंडा येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग, वरसोली, आवास येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, रुईशेत भोमोली येथे अनुसूचित जमाती व थळ येथे अनुसूचित जमाती महिला आरक्षण आहे.
जिल्हा परिषद सात व पंचायत समितीच्या 14 जागांसाठी या मतदार संघामध्ये एकूण दोन लाख एक हजार 923 मतदार आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शेकाप, महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अलिबागमधील शेतकरी भवन येथून निघणार आहे. यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, शेकाप ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, तालुका चिटणीस सुरेश घरत आदींसह उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. थळ मतदारसंघातील शेकापच्या उमेदवार सानिका सुरेश घरत असून, सुशिक्षित व सुसंस्कृत उमेदवार आहेत. त्यांची उमेदवारी रविवारी जाहीर करण्यात आली. शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या त्या कन्या उमेदवार आहेत. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार आहे.
जिल्ह्यात 23 अर्ज दाखल
रायगड जिल्हा परिषदेच्या 59 व पंचायत समितीच्या 118 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. आजपर्यंत 22 अर्ज दाखल झाले असून, त्यात जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 12 व पंचायत समितीच्या सदस्यपदाच्या जागांसाठी 11 अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यात अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांसाठी एकूण आठ अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे.
अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी निवडणूक होणार आहे. शनिवारी एक अर्ज दाखल झाला होता. त्यानंतर सोमवारी अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वेगवेगळ्या मतदारसंघातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले. एका दिवशी एकूण सात अर्ज दाखल करण्यात आले. आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या सदस्यपदासाठी सहा आणि पंचायत समितीच्या सदस्यपदासाठी दोन अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे एकूण आठ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 21 जानेवारीपर्यंत आहे. त्यामुळे आता फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.







