उद्या रंगणार महामुकाबला; भारत-पाक लढतीकडे नजरा

सामन्यावर पावसाचे सावट; राखीव दिवसाचे नियोजन

| कोलंबो | वृत्तसंस्था |

आशिया चषकातील सुपर 4 मध्ये रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. या सामन्यावर पावसाचे सावट आहे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता पाऊस आल्यास हा सामना राखीव दिवशी अर्थात सोमवारी खेळवला जाईल. खरं तर, याआधी साखळी फेरीत झालेल्या सामन्यात हे दोन्ही संघ भिडले होते. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अनिर्णित राहिला अन्‌‍ दोन्हीही संघांना 1-1 गुण देण्यात आला.

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे 10 सप्टेंबरच्या सामन्याबाबत संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. याच कारणामुळे राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. लक्षणीय बाब म्हणजे, 10 सप्टेंबरला सामना थांबल्यास 11 तारखेला तिथूनच सामना सुरू केला जाईल.
भारत-पाक यांच्यात अंतिम लढत अपेक्षित धरून त्यासाठीही राखीव दिवसाचे प्रयोजन केले आहे. आशिया करंडक म्हणजे जणू भारत-पाक असे समीकरणच तयार करण्यात आले होते. आता तर त्याच दृष्टीने या सामन्याला झुकते माप देण्यात आले. रविवारी भारत-पाक सुपर फोरमधील सामना होत आहे.

पावसाचा व्यत्यय आल्यास
पावसामुळे खेळ होऊ शकला नाही तर सोमवारी सामना होईल किंवा रविवारी खेळ सुरू झाला आणि पावसाचा व्यत्यय आला तर खेळ जेथे थांबला जाईल तेथून दुसऱ्या दिवशी उर्वरित खेळ होईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रबदल न करण्यामागे खरे कारण काय? - गावस्कर
कोलंबोत पावसाची शक्यता असतानाही आशिया चषकाचे ‌‘सुपर फोर' फेरीतील सामने तेथून हंबन्टोटा येथे हलविण्याचा निर्णय घेतला गेला नाही, यामागचे खरे कारण काय? असा सवाल भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी उपस्थित केला आहे. “केंद्रबदल न करण्यामागे खरे कारण काय होते हे कोणीतरी शोधून काढले पाहिजे. क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पाहायचे तर खेळाडूंचा हंबन्टोटा येथे खेळण्यास विरोध होता असे दिसते. कोलंबोतील हवामान लक्षात घेता आयोजकांची हंबन्टोटा येथे सामने खेळवण्याची बहुधा तयारी होती. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांना हा निर्णय बदलावा लागला,” असे गावस्कर म्हणाले. तसेच कोणत्याही एका देशाच्या खेळाडूंचा केंद्रबदलास विरोध होता असे आपले म्हणणे नाही हे गावस्कर यांनी स्पष्ट केले.
शाहीनविरुद्ध अनोखी रणनीती
पहिल्या सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा सामना करताना भारतीय संघाच्या फलंदाजांना घाम फोटला. अशा परिस्थितीत भारतीय संघ आता पाक गोलंदाजाना कसे सामोरे जायचे याची तयारी करत आहे. यावेळी टीम इंडियाच्या सरावात थ्रोडाउन विशेषज्ञ नुवान सेनेविरत्ने आणि दुसरे डेटा विश्लेषक हरी प्रसाद मोहन यांनी फलंदाजांकडून डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांना सामोरे जाण्याची तयारी केली. सरावामध्ये सेनाविरत्नेकडे चेंडू स्विंग करण्याचे खास उपकरण होते. ज्याद्वारे तो चेंडू इनस्विंग करत होता आणि चेंडू बाहेर काढत होता. तर हरी प्रसाद आपल्या टॅबवर भारतीय फलंदाजांचे नियतंत्र रेकॉर्ड करत होते.
Exit mobile version