माथेरानमध्ये टाळ-मृदुंगाचे स्वर

गणेशोत्सवानिमित्त भजन मंडळींचा सराव जोरात
। माथेरान । वार्ताहर ।
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर गणपती बाप्पाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषात होणार असून, याचा उत्साह अधिक वाढविण्यासाठी येथील भजन मंडळींच्या सरावाला आता चांगलाच वेग आला आहे. दरवर्षी नवे भजन सादर करण्याचा प्रघात असल्याने काही तरी वेगळे सादरीकरण करण्यासाठी येथील काही घरांमध्ये टाळ-मृदंगाचे स्वर निनादू लागले आहेत.

माथेरानमध्ये एकूण तीन भजन मंडळींचे ग्रुप आहेत. आत्ता तर येथील काही महिलांनीदेखील मागील चार वर्षांपासून भजन मंडळी ग्रुप तयार केला आहे. या महिलादेखील घरोघरी जाऊन भजने करतात. गणेशोत्सवात जिथे गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत, अशा घरी भजनी मंडळी यांना बोलावून भजने करून घेण्याकडे गणेशभक्तांचा मोठा कल असतो. यामुळे भजन मंडळींना मागणी वाढते. सायंकाळपासून रात्रीपर्यंत ही भजने रंगतात. आपले भजन लोकांना आवडावे याकरिता भजन मंडळीदेखील नवनवीन रचनांचे सादरीकरण करण्यासाठी जोरदार तयारी करीत असतात.

श्रावण महिना सुरू झाला की आम्ही भजन मंडळी सरावाला सुरुवात करतो. दरवर्षी स्वरचित संतांचे अभंग, गवळणीसह नवीन गाण्यांचे सादरीकरण करण्याचा आम्ही प्रेयत्न करीत असतो. यंदाही काही तरी नवीन सादरीकरणाचा आमचा मानस असून, भजन सरावाला सुरुवात केली आहे.

– उमेश ढेबे, भजनीबुवा, माथेरान



Exit mobile version