टोरंटच्या मशिनरीमुळे वाट बिकट

भालिवडी-आंबोट रस्त्याची दुरवस्था; शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त

| नेरळ| प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खालाटी येथील प्रस्तावित टोरंट पॉवरच्या 3 हजार मेगावॅट उदंचन जलविद्युत प्रकल्पावरून संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रकल्पासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असतानाच टोरंटची अवजड मशिनरी भालिवडी परिसरात दाखल झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. प्रकल्पाला शासनाची अंतिम मंजुरी नसताना मशिनरी आलीच कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.

साई डोंगर प्रकल्पासाठी भालिवडी ते साई डोंगर असा 5.91 किलोमीटरचा रस्ता प्रस्तावित असून, त्यासाठी 390 शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांनी या रस्त्याला विरोध केला असून भूसंपादन अधिकाऱ्यांकडे तक्रारीही दाखल केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी करण्यासही विरोध केला होता. असे असतानाच रस्ता तयार करण्यासाठी आणि खोदकामासाठी अवजड मशिनरी परिसरात आणण्यात आली आहे. या मशिनरीच्या वाहतुकीमुळे भालिवडी-आंबोट रस्त्याची दुरवस्था सुरू झाली आहे. शेतकऱ्यांचा विरोध आणि मंजुरीचा प्रश्न कायम असताना कंपनीने मशिनरी आणण्याची घाई का केली, असा संतप्त सवाल पर्यावरण बचाव समिती व ग्रामस्थांनी केला आहे. शेतकऱ्यांचा विरोध डावलून काम सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास परिसरात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version