प्रकल्पासाठी साधारण सहाशे एकर जमीन घेणार
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात येऊ घातलेल्या प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्प यामुळे वनसंपदा धोक्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी साधारण सहाशे एकर जमीन एकट्या वन विभागाची घेतली जाणार आहे. वन विभागाने आपल्या जमिनी मध्ये जंगल फुलवले असून, अनेक जंगले राखून ठेवण्याचे काम वन विभागाकडून होत आहे. मात्र, या प्रकल्पासाठी डोंगर, दऱ्या, नदी नाले आदी सर्व भागात मोठ्या प्रमाणात वनसंपदा वसली आहे. आज त्याच वनसंपदेवर घाला घातला जाणार आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात जैव विविधता संपुष्टात येणार असल्याने पर्यावरण प्रेमी देखील टोरंट प्रकल्पाला विरोध करू लागले आहेत.
तालुक्यात बिबट्या या प्राण्याचा वावर असलेल्या भागातील वन संपदेवर घाला घालणारा टोरंट प्रकल्प तालुक्यात आणला जात आहे. कर्जत तालुक्यात ज्या तीन ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे दरवर्षी आढळून येत असते आणि त्या भागातील बिबट्या हा मनुष्य वस्तीमध्ये जाऊन जनावरांवर हल्ला करतो. त्या भागात जलविद्युत प्रकल्प उभा राहणार असून, बिबट्याचे वास्तव्य असलेले प्रदेश हा प्रचंड अशा जंगलाने व्यापलेला भाग समजला जातो आणि त्याचा भाग टोरंट कंपनीला आंदण देण्याचं डाव शासनाने आखला आहे. पाली आणि पोटल तसेच आंबोट भागात दरवर्षी बकऱ्या, गोठ्यात बांधलेल्या जनावरे यांच्यावर हल्ला करण्याचे काम बिबट्या सारखा हिंस्त्र प्राणी करीत आला आहे. त्याभागात टोरंट साठी जमीन देण्याचा हालचाली शासनस्तरावर सुरु असून, या हालचाली जैवविविधता यासाठी धोकादायक आहेत.
टोरंट आपला प्रकल्प उभारणार असलेल्या भागात औषधी वनस्पती देखील मोठ्या प्रमाणात असल्याच्या नोंदी वन विभागाकडे आहेत. असे असताना हा प्रकल्प बांधकामामुळे जैवविविधतेवर थेट परिणाम होणार आहे. प्रस्तावित साईडोंगर-1- कर्जत उदंचन जलविद्युत प्रकल्पामध्ये डोंगर माथ्यावर ऊर्ध्व जलाशय तयार करण्यासाठी 233 हेक्टर वनजमीन आवश्यक असून, या जमिनीवर अंदाजे 48,000 झाडे व झुडुपे तोडावी लागतील असे सांगितले जात असले तरी पाण्याचे क्षेत्र ज्या भागात साठा करून राहणार आहे. त्या भागातील काही लाख झाडांचे आयुष्य संपुष्ठात येणार आहे. त्याचवेळी वन्यजीव यांचा अधिवास संपुष्ठात येणार आहे. त्यामुळे जंगल भागातील हिंस्त्र प्राणी स्थलांतर करुन मानवी वस्तीत घुसण्याची शक्यता अधिक आहे. या भागामध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे परिसरातील वनस्पती जीवनावर नकारात्मक प्रभाव दिसून येईल. कामगार तात्पुरती घरे बांधण्यासाठी लाकूड, इंधनासाठी झाडांची कत्तल करू शकतात. परंतु, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऊर्जा संवर्धन योजना राबविली जाणार असल्याने वृक्षतोड अपेक्षित आहे.
जैवविविधता संपुष्टात
प्रकल्पाची रचना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असून, पश्चिम घाट अंतर्गत हा प्रदेश येत आहे. पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात असून, प्रस्तावित प्रकल्पाकरिता यात 233 हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे. जिथे केवळ झुडपे आणि गवत-प्रबळ समुदाय प्रमुख आहेत. क्रोमोलेना ओडोराटा, युरेना लोबाटा आणि हायग्रोफिला सर्पिलम यांसारख्या काटेरी, रसाळ आणि झेरोफिटिक झुडूपांचे मिश्रण सामान्य आहे. तर वृक्षांमध्ये बुटीया मोनोस्पर्मा, कॅसिया फिस्टुला, अझादिराच्टा इंडिका आदी लहान आकाराचे वृक्ष आहेत. तर प्रवाहाच्या बाजूंना असलेल्या उतारांवर म्हणजे खालच्या जलाशयात केरिया आरबोरिया, टर्मिनलिया अलता, टर्मिनलिया अर्जुना असे वृक्ष असून, काही वृक्ष हे दुर्मिळ असून त्यातील अनेक वनस्पती या दुर्मिळ समजल्या जात असून औषधी वनसंपत्ती या धोरणामुळे नष्ट होणार आहेत.
