विजेचा लपंडाव सुरू
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात गेली दोन दिवस पावसाने जोरदार बॅटिंग करीत शेतकर्यांना दिलासा दिला आहे. माथेरानमध्येसुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, नेरळ-कळंब मार्गावरील दहिवली मालेगाव पुल पाण्याखाली गेला आहे.
कर्जत तालुक्यात शनिवारी (दि.6) दिवसभर पाऊस सुरू असून रात्री विजांचा कडकडाटदेखील सुरू होता. त्यामुळे तालुक्यातून वाहणार्या उल्हास नदीलादेखील पूर आला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यातील हा पहिला पूर आला असून उल्हास नदीवरील नेरळ-कळंब रस्त्यावरील मालेगाव दहिवली येथील पुल पाण्याखाली गेला होता. पुल पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा अडकून पडला असून दहिवली आणि मालेगाव मधील तरुणांनी एकत्र येत येथील कचरा बाजूला करण्याचे काम केले.
कर्जत तालुक्यात रविवारी (दि.6) 115 मिली पावसाची नोंद झाली असून तालुक्यात आतापर्यंत 793 मिली पावसाची नोंद झाली असून गतवर्षी 3397 मिली पाऊस झाला होता. मात्र, या पावसामुळे तालुक्यातील शेतीच्या कामांची लगबग वाढली आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये गेली दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे माथेरानमधील वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असून माथेरान शहरात पर्यटकांची मोठी गर्दी असून पर्यटकांनी पावसाचा आनंद घेतला आहे. मात्र, जोरदार पावसामुळे रात्रभर विजेचा लपंडाव सुरू होता. यामुळे रात्री उशिरापर्यंत पर्यटकांना बाजारपेठेत थांबता आले नाही. माथेरान शहरात रविवारी तब्बल 220 मिली पाऊस झाला असून आतापर्यंत 1142 मिली पाऊस झाला आहे.