कर्जतला वादळी पावसाचा तडाखा

विजेचे खांब कोसळले, वीज रोहित्र जळाले
सायंकाळपर्यंत पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न

| नेरळ | वार्ताहर |

सतत सुरू असलेल्या वादळी वार्‍यामुळे कर्जत तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वादळी वार्‍यामुळे तालुक्यातील तीन ठिकाणची वीज रोहित्र जळून नादुरुस्त झाली आहेत, तर वीज प्रवाह वाहून नेणारे खांब कोसळले असल्याने महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणकडून सर्व अधिकारी वर्ग फिल्डवर काम करताना दिसत आहे.

कर्जत तालुक्यात गेली पाच दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात गेली काही दिवस पावसासोबत वादळी वारादेखील वाहत आहे आणि त्या वादळी वार्‍यामध्ये महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात तीन ठिकाणी वीजपुरवठा करणारे वीज रोहित्र जळून गेले असून, एलटी वीज वाहक खांब आणि कंडक्टर यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वार्‍यासह येत असलेल्या पावसामुळे तालुक्यांत नेरळ आणि कडाव परिसरात महावितरण कंपनीचे मोठे नुकसान केले आहे नेरळ उपकेंद्र अंतर्गत येत असलेले बोपेले येथील फिडर बंद पडले असल्याने त्या परिसरातील 30पेक्षा जास्त गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.तर त्याच भागातील कोल्हारे साई मंदिर येथील 200 केव्हीए क्षमतेचे तसेच कोल्हारे गावातील 63 केव्हीए क्षमतेचे वीज रोहित्र यांच्या बिघाड झाला आहे.

कळंबोली येथे महावितरणचे कर्जत तालुक्याच्या मुख्य सब स्टेशन आहे, त्या ठिकाणी वीज पोहचविणारे एलटी वीज प्रवाहाचे तीन खांब कोसळले आहेत, तर कुंभे येथील एक, माणगाव येथील एक, बोपले येथील दोन, शेलूजवळील बंधीवली येथे तीन, भानसोली येथे एक, नेरळ निर्माण नगरी येथे एक वीज वाहक खांब यांचे नुकसान वादळाने केले आहे. तर, भानसोळी येथील वीज वाहक कंडक्टरदेखील नादुरुस्त झाले असल्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे सहायक अभियंता गणेश देवके यांच्या मदतीला कर्जत तालुक्यातील सर्व शाखा अभियंते फिल्ड् वर आहेत. तर, नेरळ येथील कोमळवाडी येथे पाच खांब कोसळले असल्याने नेरळ येथील दोन्ही शाखा अभियंता त्या मोहिमेवर आहेत. माथेरानला खालून वीजपुरवठा होत असल्याने माथेरान येथील शाखा अभियंता संतोष पादीर हे आपत्ती व्यवस्थापन काळात कळंबोली सब स्टेशन येथे मोहिमेवर आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत नेरळ भागाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांचा प्रयत्न सुरू आहे. तर, जळालेले वीज रोहित्र पनवेल येथून बदलून आणण्याची कार्यवाहीदेखील तात्काळ युद्धपातळीवर सुरू आहे.

Exit mobile version