। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील जीतनगरमधील एका विवाहित महिलेचा सासरच्या मंडळीकडून छळ करण्यात आला. ही घटना 2023 ते 2025 या कालावधीमध्ये घडली असून पतीसह सहा जणांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.01) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कशिश मकानदार आणि हमलिक मकानदार हे नात्याने पत्नी आणि पती आहेत. या दोघांचे काही महिन्यापूर्वी लग्न झाले. गेली अनेक महिने या दोघांचा संसार गुण्यागोविंदाने चालत होता. मात्र सासरकडून वेगवेगळ्या वस्तू खरेदीसाठी पैशांची मागणी करण्याचा प्रकार सुरू झाल्याने या संसाराला गालबोट लागले. हमलिक मकानदार याने कशिश मार्फत तिच्या वडीलांकडून जेसीबी खरेदी करण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु ती रक्कम देण्यास नकार दिला. याचा राग धरून हमलिक याने घरातील अन्य मंडळीच्या मदतीने छळ करण्यास सुरुवात केली. वेळोवेळी हाताबुक्क्याने मारहाण करणे, शिवीगाळी करून शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. 1 ऑगस्ट 2023 ते 1 जुलै 2025 या कालावधीत हा सर्व प्रकार वायशेतमधील जितनगर येथील भिसमिल्ला जमेदार यांच्या चाळीत घडला.
अखेर या जाचाला कंटाळून पीडित महिलेने अलिबाग पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांना विरोधात तक्रार केली. पती हमलिक हाजीमलंग मकानदार (23), सलगा मकानदार (सासू), नेहा मकानदार (नणंद), आशा मकानदार, मेहबूब मकानदार (काका सासरे), सलमान मकानदार (चूलत दिर), सर्व रा. जितनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






