। महाड । प्रतिनिधी ।
मोटारसायकल वरून आलेल्या अज्ञात इसमांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करत अंगावरील सोने डिकीत काढून ठेवा असे सांगून काढलेले दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी महाड बाजारपेठेत घडली. यामुळे पोलीस प्रशासन देखील चांगलेच हडबडून जागे झाले. शहरातील काकरतळे भागात राहणारे प्रभाकर रतन चव्हाण वय 68 हे सायंकाळी बाजारपेठेत गेले असता छ.शिवाजी चौक ते वीरेश्वर मंदिर रस्त्यावरून स्कुटीवरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा विश्वास संपादन करत आपण पोलीस असून या भागात आपली तपासणी सुरु आहे असे सांगितले. अंगावरील दागिने गाडीच्या डिकीत काढून ठेवा असे सांगीतले.
यावरून प्रभाकर चव्हाण यांनी अंगावरील दागिने पिशवीत काढून मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तीने हे दागिने डिकीत ठेवल्याचे भासवले. कांही अंतर गेल्यानंतर डिकीत दागिने ठेवले कि नाही याची जाणीव झाल्याने त्यांनी स्कुटी थांबवून पहिले असता आपली फसवणूक झाल्याचे उघड झाले. 3.50 तोळ्याची चेन सुमारे 1,05000, 7 ग्रॅम सोन्याची अंगठी सुमारे 21,000, 1.50 तोळ्याचे ब्रेसलेट सुमारे 45,000 असा एकूण 1,71,000 रुपये किमतीचा माळ लंपास केला आहे. याप्रकरणी अज्ञात इसमांविरोधात भाद्वी कलम 170,420,406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास नाईक हे करीत आहेत.