भाजपसाठी लढत कठीण

वर्सोव्यात अल्पसंख्याक मतांवर भवितव्य

। मुंबई । वृत्तसंस्था ।

वर्सोवा विधानसभा मतदारसंघात गेली दोन वर्षे सलग निवडून आलेल्या भाजपच्या आमदार भारती लव्हेकर यांना यंदा ही निवडणूक जिंकण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना तब्बल 21,090 मतांची आघाडी मिळवून देणार्‍या या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेल्या मुस्लीम मतदारांच्या हाती लव्हेकर यांचे भवितव्य आहे.

2008 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला. 2009 मध्ये ही जागा काँग्रेसकडे होती. मात्र, 2014 मध्ये मोदी लाटेत लव्हेकर चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या. लव्हेकर या मूळच्या दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या. मात्र, 2014 पासून त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली आणि विजयी ठरल्या. 2019 च्या निवडणुकीत एकत्रित शिवसेनेच्या राजुल पटेल यांचा अधिकृत अर्ज बाद होऊन त्या अपक्ष उभ्या राहिल्या, हे लव्हेकर यांच्या पथ्यावर पडले.

आता मात्र तशी स्थिती नाही. लव्हेकर यांना लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेली मोठी पिछाडी कमी करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. ‘एमआयएम’ चे रईस लष्करिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदेश देसाई आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे बंडखोर राजू पेडणेकर यांच्यात होणार्‍या मतांच्या विभाजनामुळे लव्हेकर यांना फारसा फायदा होईल, असे वाटत नाही. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे या मतदारसंघात फारसे प्राबल्य नाही. त्यामुळे लव्हेकर या किती मुस्लीम मते मिळवितात, यावर त्यांचे विजयाचे गणित अवलंबून आहे. लव्हेकर यांना यावेळी उमेदवारी मिळेल किंवा नाही, याबाबत शेवटपर्यंत साशंकता होती. अगदी शेवटच्या क्षणी त्यांची उमेदवारी जाहीर झाली. उपविभागप्रमुख असलेल्या हारुन खान यांना अल्पसंख्याक म्हणून उमेदवारीची संधी मिळाली आहे. अल्पसंख्याकांची किती मते घेण्यात त्यांना यश येते, यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. या मतदारसंघात एक लाख सहा हजार (38 टक्के) मुस्लिम, 65 हजार (23 टक्के) उत्तर भारतीय आणि त्या खालोखाल 57 हजार (20 टक्के) मराठी, 22 हजार 700 (आठ टक्के) गुजराती-मारवाडी, 14 हजार 600 (पाच टक्के) दक्षिण भारतीय या मतदारांवर उमेदवारांची भिस्त आहे.

2019 मधील मते
2019 मध्ये डॉ. भारती लव्हेकर यांना 41 हजार 57 तर काँग्रेसचे बलदेव खोसा यांना 36 हजार 871 मते मिळाली. अपक्ष उभ्या राहिलेल्या राजुल पटेल यांनी 32 हजार 706 तर मनसेचे संदेश देसाई यांना फक्त पाच हजार 37 मते मिळाली होती. लव्हेकर या फक्त पाच हजार 186 मतांनी विजयी झाल्या होत्या.
मतदार संख्या : एकूण मतदार  दोन लाख 86 हजार 711 : पुरुष  एक लाख 53 हजार 392, महिला  एक लाख 32 हजार 776.
Exit mobile version