पांडवकडा परिसरात सोमवार ते शुक्रवारी पर्यटकांची गर्दी
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
दरवर्षी प्रमाणे यंदाही खारघर पोलीस ठाणे हद्दीतील पांडवकडा परिसरातील धबधब्याच्या ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी जाण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. तशा प्रकारचे सूचना फलकदेखील पोलिसांनी सर्वत्र लावले आहेत. मात्र, हे करत असताना शनिवार आणि रविवार सोडून इतर दिवशी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला जात नसल्याने शनिवार आणि रविवार सोडल्यास बंदी असलेल्या ठिकाणी पर्यटक गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत असून, यामध्ये कॉलेजमधील तरुणाईची संख्या अधिक आहे.
पावसाळी पर्यटन करण्याला अनेकजण पसंती देत असतात. यामुळे पावसाळ्यात धबधब्याची ठिकाणे, तळी, धरणे अशा ठिकाणी मोठी गर्दी होत असते. खारघरमधील पांडवकडा याठिकाणीदेखील पर्यटक मोठी गर्दी करतात. यामुळे पांडवकडा हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची घोषणा प्रशासनाकडून दरवर्षी करण्यात येते. मात्र, ही घोषणा अद्याप प्रत्यक्षात उतरली नसून, या ठिकाणी येणारे अनेक उत्साही पर्यटक उत्साहाच्या भरात स्टंटबाजी करत असल्याने अनेकदा या ठिकाणी अपघात घडत असतात. घडणारे अपघात रोखण्यासाठी पावसाळ्यात खारघरमधील पांडवकडा, ड्रायव्हिंग रेंज, चाफेवाडी, फणसवाडी, ओवे कॅम्प येथील धरण, तळोजा जेलसमोरील डोंगर तसेच तलाव या ठिकाणी जाण्यास प्रशासनाने 17 जूनपासून 30 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत बंदी घातली आहे. बंदीचे उल्लंघन करणार्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र, तरीसुद्धा पर्यटक या ठिकाणी गर्दी करत असल्यामुळे भविष्यात या ठिकाणी अपघात घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.